नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकसभा निवडणूक उत्सवाचा सहावा टप्पा आज, ;शनिवारी (दि.२५ मे) पार पडणार आहे. या टप्प्यात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील लोकसभेच्या ५८ जागांकरिता मतदान होईल. या निवडणुकांचे आतापर्यंतचे पाच टप्पे काही तुरळक प्रकार वगळता शांततेत पार पडले. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात लोकसभेच्या १४, हरयाणा, दिल्लीतील सर्व जागा अनुक्रमे १० व ७ यांच्यासाठी मतदान होईल. दिल्ली, हरयाणातील लढतींकडे सर्वांचे अधिक लक्ष लागून राहाणार आहे. त्याच दिवशी ओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात ४२ जागांसाठी जनता कौल देणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील मतदान उद्या, शनिवारी होणार आहे. खराब हवामान व रसदविषयक काही बाबींमुळे या मतदारसंघातील निवडणूक तिसऱ्या टप्प्याऐवजी सहाव्या टप्प्यात घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. ओदिशा, पश्चिम बंगालमधील काही लोकसभा जागांवरही उद्याष शनिवारी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, पश्चिम बंगालमधील काही जागांसाठी निवडणूक होणार आहे. ही राज्ये भाजप व काँग्रेसच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत.
दिल्लीत प्रतिष्ठा पणाला?आप आणि काँग्रेसने हातमिळवणी केल्यामुळे केंद्रातील भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सात जागांवर मतदानासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. उद्या रणरणत्या उन्हात दिल्लीतील १ कोटी ५२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक बडी नावे उद्या मतदान करतील.
ओदिशामध्ये बिजद, भाजप, काँग्रेस आक्रमकओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या, ४२ जागांसाठी होणाऱ्या लढतीत बिजद, भाजप, काँग्रेस व अन्य पक्ष मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आक्रमक प्रचार करीत आहेत. या राज्यातील निवडणुकांचा चौथा टप्पा १ जूनला पार पडेल.त्याच दिवशी लोकसभा निवडणुकांचा अखेरचा व सातवा टप्पा होणार आहे. बिजदवर भाजपने कडक टीका सुरू ठेवली आहे. हे ओडिशातील यावेळच्या विधानसभा निवडणुकांचे मोठे वैशिष्ट्य आहे.
सहाव्या टप्प्यात ११.१३ कोटी मतदार- लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात ११.१३ कोटी मतदार असून त्यामध्ये ५.८४ कोटी पुरूष, ५.२९ कोटी महिला, ५१२० तृतयीपंथीय मतदार आहेत.- शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी मतदान होतो हा समज यावेळी खोटा ठरवावा असे आवाहन निवडणूक आयोगाने दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबादसहित अन्य शहरी मतदारांना केले आहे.- लोकसभा निवडणुकांचा सर्वात शेवटचा, सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार असून लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. २५ राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील तसेच ४२८ लोकसभा मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया या निवडणुकांच्या पहिल्या पाच टप्प्यांतच पूर्ण झाली आहे.