नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिझोराम वगळता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत रविवारी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झाली असून, निकालाकडे सर्वपक्षीय उमेदवारांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये, तर तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे.
इंडिया की एनडीए? अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर होणाऱ्या या निकालामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आणि सत्ताधारी ‘एनडीए’ आघाडीची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे.
तेलंगणात बीआरएस की काँग्रेस? तेलंगणात बीआरएस सरकार हॅटट्रिक करते की काँग्रेस सहा हमी योजनेची जादू दाखविते, ते निकालानंतर स्पष्ट होईल. प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव, त्यांचे पुत्र के.टी.रामाराव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डींचा समावेश आहे.
राजस्थानात कोण मारणार बाजी? राजस्थानात १९९ जागांसाठी १८६२ उमेदवार रिंगणात होते. तिथे ७५.४५ टक्के मतदान झाले होते. राज्यात सत्तारूढ काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुकाबला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून दर विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन होते ही परंपरा आहे. यंदा काय होणार, याबाबत उत्सुकता आहे.
‘एमपी’त अधिक मतदान कुणाच्या पथ्यावर? मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर रोजी २३० विधानसभा मतदारसंघांत मतदान झाले होते. राज्यात विक्रमी ७७.८२% मतदान झालेले आहे. २०१८ च्या निवडणुकीच्या तुलनेत ते २.१९ टक्के अधिक आहे. ते कुणाला फायदेशीर ठरेल किंवा कुणाला त्याचा फटका बसेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
छत्तीसगडमध्ये १,१८१ उमेदवारांचा निकालछत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील ७६.३१ टक्के मतदान झाले होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी.एस.सिंहदेव, माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
सध्याची स्थिती
राजस्थान - कॉंग्रेस - अशोक गेहलोतमध्य प्रदेश - भाजप - शिवराज सिंह चौहानछत्तीसगड - कॉंग्रेस - भूपेश बघेलतेलंगणा - बीआरएस - के. चंद्रशेखर राव