ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 30 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सला कोणीच विकत घेण्यास उत्सुक नसल्याचं चित्र दिसत आहे. किंगफिशअर एअरलाईन्सचा ब्रँण्ड आणि ट्रेडमार्कचा लिलाव करण्यात आला मात्र तो अपयशी झाला आहे. 366.7 कोटींच्या रिझर्व्ह प्राईसवर कोणी बोली लावलीच नाही. बँकांतर्फे हा लिलाव करण्यात आला.
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. है पैसे परत मिळवण्यासाठी मल्ल्यांच्या संपत्तीचा लिलाव बँका करत आहेत.
किंगफिशर एअरलाईन्सची सुप्रसिद्ध टॅगलाईन 'फ्लाय द गुडटाईम्स'ला देखील कुणीच विकत घेतलेलं नाही. या लिलावात लोगो व्यतिरिक्त फ्लाईंग मॉडेल्स, फ्लाय किंगफिशर आणि फ्लाईंग बर्ड सर्व्हिस यांच्या ट्रेडमार्कचादेखील लिलाव करण्यात येणार होता. गेल्या महिन्यातदेखील विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर हाऊसच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नव्हता. खरेदीदारांच्या अभावी किंगफिशर हाऊस विकले गेले नव्हते.
2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.