लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा कोणताही उमेदवार राहुल गांधींचा सहज पराभव करू शकतो, असा आत्मविश्वास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे. त्या मंगळवारी अमेठी येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, गेल्या चार वर्षांत राहुल गांधी या मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक हरले आहेत. जो माणूस स्वत:च्या मतदारसंघात फिरकत नाही, तो पुन्हा देशात तरी येईल का, याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाचा कोणताही उमेदवार राहुल गांधींचा पराभव करेल, असे स्मृती इराणी यांनी म्हटले.
राहुल गांधी सध्या सोनिया यांच्यावरील वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात गेले आहेत. यापूर्वी परदेशात जाण्यावरून भाजपासह विरोधकांनी राहुल यांना अनेकदा लक्ष केले होते. त्यामुळे यावेळी परदेशात जाताना राहुल गांधींनी भाजपाला ट्विटरवरून टोला लगावला होता. मी आईच्या उपचारांसाठी काही दिवस परदेशात असेन. भाजपाच्या सोशल मीडिया ट्रोल आर्मीतील माझ्या मित्रांनो, फार त्रास करुन घऊ नका. मी लवकरच परतेन, असे खोचक ट्विट राहुल यांनी केले होते.