पंतप्रधान ज्या व्यक्तीवर घोटाळ्याचा आरोप करतात, त्यालाच राज्याचा डीसीएम बनवतात, असे म्हणत आप नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते शुक्रवारी दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दाही उपस्थित केला.
केजरीवाल म्हणाले, "मी चार-पाच दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. त्यात मी त्यांच्याशी पाच मुद्द्यांवर बोललो. यातील एक मुद्दा असाही होता की, पंतप्रधान मोदींनी या देशातील सर्वात भ्रष्ट नेत्यांना ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून अथवा पैशांचे आमिष दाखवून इतर पक्षांपासून तोडून आपल्या पक्षात सहभागी करून घेत आहेत, याच्याशी आपण (मोहन भागवत) समहत आहात का?"
यानंतर केजरीवाल म्हणाले, "27 जून 2023 रोजी पंतप्रधान म्हणाले होते, अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आम्ही यांना कारागृहात पाठवू. मात्र, पाच दिवसांनंतर 2 जुलैला त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घेतले आणि उपमुख्यमंत्री बनवले. मी त्यांना (भाजप) विचारू इच्छितो की, तुम्हाला काही ला** वाटते का… तुम्ही तुमच्या गल्लीत आणि घरात गेल्यावर काय तोंड दाखवता?"
केजरीवाल म्हणाले, "22 जुलै 2015 रोजी भाजप म्हणते, हिमंता बिस्वा सरमा मोठे भ्रष्टाचारी आहेत. एक महिन्यानंतर 23 ऑगस्ट 2015 रोजी त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घेतात."
यानंतर, केजरीवाल म्हणाले, "एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर सीबीआय आणि ईडीची केस होती, पीएम मोदींनी बंद करवली. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची केस होती, ईओडब्ल्यूची केस होती, दोन्ही बंद करवल्या. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची केस होती, ती थंड बासनात टाकला. भावना गवाळींवर ईडीची केस होती. यशवंत जाधव यांच्यावरही ईडीची केस होती. एवढेच नाही तर, सीएम रमेश, रविंदर सिंह, संजय सेठ, सुवेंदू अधिकारी, के गीता, छगन भुजबल, कृपा शंकर सिंह, दिगंबर कामत, अशोक चव्हाण, नवीन जिंदल, तपस रे, अर्चना पाटिल, गीता कोडा, बाबा सिद्दिकी, ज्योती मिंडा, सुजाना चौधरी यांची नावे घेत, हा यांचा प्रामाणिकपणा आहे," असेही केजरीवाल म्हणाले.