नवी दिल्ली - भाजपाचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाती कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकास करु असा दावा सरकारने केला मात्र प्रत्यक्षात आता संपूर्ण देशात काश्मीरसारखी परिस्थिती उद्भवली आहे अशी टीका सिन्हा यांनी केली.
यशवंत सिन्हा यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला ते संबोधित करत होते. सरकारने कलम ३७० आणि ३५ अ हटवला कारण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला जाईल. हे मतभेद दडपण्याचे तत्व आहे असा आरोप त्यांनी केला.
संपूर्ण देश काश्मीर बनलायशवंत सिन्हा म्हणाले की, सरकारमधील लोकांनी दावा केला होता की ते काश्मीरला भारताच्या इतर राज्याप्रमाणे बनवतील, पण आज पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. जर कोणी काश्मीरमधील शोपियान, बारामुल्ला किंवा पुलवामा येथे गेले तर त्यांना सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त दिसेल. आणि आता अशीच परिस्थिती दिल्लीत निर्माण झाली आहे जिथे मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात असल्याचं दिसून येत असं माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले.
पोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा. जेएनयू हिंसाचाराबद्दल यशवंत सिन्हा म्हणाले की तुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहे. यापूर्वी ते दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करत असत पण आता ते गुंडांचा वापर करत आहेत. ते म्हणाले की जेएनयूमध्ये जे काही झाले ते सरकारी पोलिस आणि सरकारी गुंडांमधील जो फरक होता तो संपला. पोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतात, ही संपूर्ण देशातील एक विचित्र परिस्थिती आहे अशी परखड टीकाही यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर केली आहे.