नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. भाजपाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावरून थेट लक्ष्य केले होते. कुठले राहुल गांधी खरे आहेत, लंडनमधले की लुटियन्समधले? सवाल भाजपाने उपस्थित केला. दरम्यान, राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी भाजपाला जोरदार प्रत्युत्त देताना भाजपाने केलेले आरोप म्हणजे निव्वळ बकवास आहे, असा टोला लगावला आहे. नागरिकत्वाच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर आरोपांच्या फैरी झाडल्या. 2003 मध्ये बॅकअप्स नावाच्या कंपनीची इंग्लंडमध्ये नोंदणी करण्यात आली होती. राहुल गांधी हे या कंपनीचे संचालक आणि सचिव होते. या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी स्वत: ब्रिटिश नागरिक असल्याचे म्हटले होते. या कागदपत्रांच्या आधारावरच गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच ही कागदपत्रे स्वत: राहुल गांधी यांना सत्यापित केली आहेत, असा दावाही पात्रा यांनी केला. मात्र प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींवरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. ''हे आरोप निखालस खोटे आहेत. राहुल गांधी याचा जन्म भारतातच झाला. तसेच त्यांचे संगोपनही येथेच झाले. राहुल गांधी हे भारतीच आहेत हे संपूर्ण देश जाणतो, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
राहुल गांधींच्या नागरिकत्वावर भाजपाकडून प्रश्नचिन्ह, प्रियंका गांधी म्हणाल्या बकवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 3:31 PM