ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - चीन आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. फ्रान्सबरोबर राफेल लढाऊ विमानांचा, रशियाकडून एस-४०० मिसाईल सिस्टीम खरेदीचा करार केल्यानंतर भारत आता रशियाबरोबर मिळून नव्या पिढीची ब्राम्होस क्षेपणास्त्र विकसित करणार आहे.
या नव्या क्षेपणास्त्रांची रेंज ६०० किलोमीटर पेक्षा अधिक असेल तसेच लक्ष्याचाही अत्यंत अचूक वेध घेईल. या क्षेपणास्त्रामुळे भारताला पाकिस्तानातील कुठल्याही ठिकाणाला लक्ष्य करता येईल. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण समूह (MTCR) मध्ये समावेश झाल्यामुळे भारताला हे तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे.
एमटीसीआरच्या नियमानुसार गटाचे सदस्य नसलेल्या देशांना ३०० किमीपेक्षा जास्त रेंजच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची विक्री करता येत नाही. ब्राम्होसची सध्याची क्षमता ३०० किमी आहे. या रेंजमध्ये पाकिस्तानात खोलवर लक्ष्यांना टार्गेट करता येत नाही. भारताकडे ब्राम्होसपेक्षा जास्त रेंजची क्षेपणास्त्रे आहेत. पण ब्राम्होसमध्ये विशिष्ट लक्ष्याला टार्गेट करण्याची क्षमता आहे.
पाकिस्तानबरोबर कुठल्याही प्रकारच्या युद्धात हे क्षेपणास्त्र गेमचेंजर ठरले. ब्राम्होसमध्ये शत्रूच्या क्षेपणास्त्र सिस्टीमला भेदण्याची क्षमता आहे. हे एक वैमानिकरहीत लढाऊ विमानाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे लवकरच संपूर्ण पाकिस्तान ब्राम्होस टप्प्यात येणार आहे.