लोकमत न्यूज नेटवर्कलखनऊ / नवी दिल्ली : भारतासह जगातील अनेक देश तिसऱ्या ‘आंतरराष्ट्रीय योगदिनी’ योगमय झाले. ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत लहान-थोरांसह विविध स्तरांतील लोकांनी विविध आसने केली. एकालयीत कधी शरीर सैल सोडत, कधी हलकासा पीळ देत आणि श्वास-उच्छ्वासागणिक शरीरासोबत मन एकात्म करीत अवघे जग एकरूप झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमझिम पावसात लखनऊत आयोजित भव्य योग शिबिरात सहभागी झालेल्या ५० हजारांहून अधिक लोकांसोबत योगाभ्यास केला.लखनऊतील रमाबाई आंबेडकर मैदान, दिल्लीतील स्तंभावली कॅनॉट प्लेस ते लंडनस्थित ट्रॅफल्गार स्क्वेअर आणि चीनमधील भव्य भिंतीपर्यंत आयोजित योग शिबिरांमुळे अवघे विश्व ‘योगमय’ झाले होते.ही प्राचीन परंपराराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीत सामूहिक योग शिबिराचे उद्घाटन केले. योग एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. त्यामुळे अनेक आजार दूर होत स्वास्थ्य प्राप्त होते, असे ते म्हणाले.
कोविंद यांचा सहभागभाजपाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हेही दिल्लीत योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. कोविंद यांनी ४५ मिनिटे योगाची विविध आसनेही केली. योगाला जीवनाचा भाग बनवा - पंतप्रधान मोदीलखनऊत पंतप्रधान म्हणाले की, मिठाशिवाय जेवणाला गोडी येत नाही. त्याचप्रमाणे योगाला जीवनाचा भाग बनवा. सव्वाशे कोटी भारतीयांनी योगाचा अंगीकार केल्यास मानवी विचारांमुळे निर्माण होणाऱ्या सर्व संकटांपासून मानव जातीचे संरक्षण होऊ शकेल. राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही योगाभ्यास केला. पांढरा टी-शर्ट, सैल विजार असा वेश पंतप्रधान मोदी यांनी परिधान केला होता.शेतकऱ्यांनी केले शवासनभारतीय किसान युनियनच्या वतीने लखनऊ-फैझाबाद राष्ट्रीय महामार्गावर आयोजित निदर्शनात सहभागी होत शेकडो शेतकऱ्यांनी भररस्त्यावर ‘शवासन’ करून मंदसौर येथे शेतकऱ्यांवर करण्यात आलेला गोळीबार आणि केंद्र सरकारच्या जनता व शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत बाराबंकीनजीक सफेदाबाद भागात शेतकऱ्यांनी रस्त्यावर शवासन केले.रामदेवबाबांचा विक्रमाचा दावाअहमदाबादेत योगगुरू बाबारामदेव यांच्या नेतृत्वाखाली ३ लाख लोकांनी योगाभ्यास केला. हा एक जागतिक विक्रम असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचीही उपस्थिती होती.