अहमदाबाद - देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सर्वांचे लक्ष्य निवडणुकींच्या निकालाकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालांवरुन सट्टाबाजारही तेजीत आलेला आहे. गुजरातच्या पाच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. ऊंझा, मेहसाणा, अहमदाबाद, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सट्टा खेळला जातो.
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर सट्टाबाजारात निवडणुकीच्या निकालांबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुजरातमध्ये सट्टाबाजारात निकालांच्या जागेवरुन वेगवेगळे दर लावले आहेत. 21 जागांसाठी 27 पैसे, 22 जागांसाठी 60 पैसे तर 23 जागांसाठी 1 पैसे असे दर ठरलेले आहेत. तसेच 24 जागांसाठी एक रुपया 80 पैशाच्या बदल्यात 2 रुपये 20 पैसे दर सुरु आहे. गुजरातमधील 26 जागांसाठी 7 पैशाच्या बदल्यात 8 रुपये 50 दर लावण्यात आला आहे.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन सट्टाबाजारात नरेंद्र मोदी यांच्यावर 14 पैसे दर लावण्यात आला आहे तर राहुल गांधी पंतप्रधान बनतील यावर 5 रुपये दर सुरु आहे. सट्टाबाजारात ज्यांचे दर कमी त्यांची जिंकण्याची संधी जास्त असते असं मानलं जातं.
गुजरातमधील एका अंदाजावरुन लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 200 कोटींपेक्षा अधिक सट्टा लावण्यात आला आहे. दरम्यान 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे कमी आहे. गुजरातमध्ये 2014 लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर 500 कोटी रुपये सट्टा लागला होता अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर बुकीने दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर सर्व सामान्यांप्रमाणेच सट्टाबाजाराचेही लक्ष्य लागून राहिले आहे.
सध्या सट्टाबाजारात भाजपाला पसंती मिळताना पाहायला मिळत आहे मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांची कामगिरी घसरण्याचा दावाही केला जात आहे. भाजपानेतृत्वातील एनडीएला सरकार बनविण्यासाठी बहुमत मिळणं कठीण आहे तर काँग्रेस आणि युपीएची स्थितीत जास्त सुधारणा नाही. सट्टाबाजारात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पार्टी, आरएलडी आघाडी, डीएमके, तृणमूल काँग्रेस, वाईएसआर काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीची कामगिरी सुधारेल. सट्टाबाजारात उत्तर प्रदेशात भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच बंगालमध्ये भाजपाला ताकद मिळेल असंही सांगितलं आहे सोबत ओडिशामध्येही भाजपाला चांगले यश मिळेल. मात्र बहुमताला घेऊन एनडीएमध्ये चिंतेचे वातावरण आहे.