INDIA Alliance Meeting Mumbai: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्रित येत आहेत. यादरम्यान, विरोधक विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यातच आता, काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील कथित संबंधांवर पुन्हा प्रश्न उपस्थित केला.
जयराम रमेश यांनी आरोप केला की, '28 जानेवारी ते 28 मार्चपर्यंत काँग्रेसने पंतप्रधान मोदींना अदानींबाबत 100 प्रश्न विचारले होते. राहुल गांधी लोकसभेत या मुद्द्यांवर बोलले आणि त्यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले. हा अदानीचा मुद्दा नाही, तर हा मोदानीचा मुद्दा आहे. अदानींच्या शेल कंपन्यांमधील 20,000 कोटी रुपयांचा मालक कोण, याची आम्हाला कल्पना नाही. खरा मुद्दा पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांचा आहे,' अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला जयराम म्हणाले की, '2014 मध्ये 9वी g-20 शिखर परिषद ऑस्ट्रेलियात झाली होती. तेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी जी-20 सदस्यांना सांगितले होते की, काळ्या धनाविरोधात, भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध, शेल कंपन्यांविरोधात आणि टॅक्स हेव्हन्स (ज्या देशा जास्त कर सूट आहे) विरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.'
'आता आगामी 18वी जी20 शिखर परिषद दिल्लीत 8-10 सप्टेंबर रोजी होत आहे. आज अमेरिका, इंग्लंड आणि आपल्या देशातील वृत्तपत्रातून हे उघड झाले आहे की, पंतप्रधानांच्यां भांडवलदार मित्राने शेल कंपन्यांचा वापर केला, त्यात सेबीच्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे,' असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राहुल गांधींनी उपस्थित केला होता प्रश्नया वर्षी फेब्रुवारीमध्ये राहुल गांधी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आभार प्रदर्शनावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील कथित संबंधांवर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, 'भारत जोडो यात्रेदरम्यान मी सगळीकडे फक्त अदानीचेच नाव ऐकले.' संसदेतील भाषणादरम्यान राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचा फोटोही दाखवला होता.