एस. पी. सिन्हा/विभाष झा
पाटणा : बिहारमधील एका मतदारसंघाची देशभरात चर्चा आहे, ताे म्हणजे पूर्णिया. या ठिकाणी बाहुबली राजकारणी पप्पू यादव यांनी बंडखाेरी केली असून ते अपक्ष निवडणूक लढवित आहेत. लालु यादव यांच्या ‘आरजेडी’च्या बीमा भारती आणि ‘एनडीए’चे उमेदवार संताेषकुमार कुशवाहा यांना त्यांचे कडवे आव्हान आहे. दाेन्ही उमेदवारांनी पप्पू यांना शह देण्यासाठी अजीत सरकार हत्याप्रकरण उचलून धरले. त्यामुळे पूर्णियामध्ये वातावरण चांगलेच तापले आहे.
कुशवाहा यांनी अजीत यांना आदरांजली अर्पण करताना पप्पू यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘अजीत यांची ज्यांनी हत्या केली, जाे व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करायचा, त्याला जनता ओळखून आहे. जनता पुन्हा पूर्णियाला जंगलराज बनू देणार नाही.’ तर बीमा भारती यांनी अजीत हे गाेरगरिबांचे नेते हाेते, असा उल्लेख केला.
१९९०ची पुनरावृत्ती हाेणार?पप्पू यादव हे १९९०मध्ये सर्वप्रथम मधेपुरा येथून अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले हाेते. त्यांची सीमांचल भागात प्रचंड दहशत हाेती. माकप नेते अजीत सरकार यांच्या हत्येचा त्यांच्यावर आराेप हाेता. त्यांना शिक्षाही झाली हाेती. मात्र, उच्च न्यायालयाने पुरव्याच्या अभावी त्यांची सुटका केली. आता ते पुन्हा अपक्ष लढत असून १९९०चा कित्ता पुन्हा गिरविण्याच्या प्रयत्नात आहेत.
युपीए, एनडीए अडचणीतपप्पू यादव यांना निवडणूक आयाेगाने कैची हे चिन्ह दिले आहे. त्यांच्या कैचीमध्ये युपीए आणि एनडीएचे उमेदवार अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी काॅंग्रेसच्या खासदार असलेल्या त्यांच्या पत्नी रंजीता रंजन या विराेधात प्रचार करताना दिसणार आहेत.
असे आहे मतदारांचे समीकरण
७ लाख अल्पसंख्याक५ लाख मागासवर्गीय१.५ लाख यादव२.५ लाख ब्राह्मण व राजपूत