- डॉ. खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : बटर-चिकन आणि दाल-मखनीचा शोध कोणी लावला? यावरून दोन रेस्टॉरंटचा वाद दिल्ली हायकोर्टात पोहोचला आहे. मोती महल रेस्टॉरंट्सनी बटर-चिकन आणि दाल-मखनीचे शोधक ही टॅगलाइन वापरण्यास ‘दर्यागंज रेस्टॉरंट’ला प्रतिबंध करावा म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली. ‘मोती महल’चे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज कुंदनलाल गुजराल यांनी या पदार्थांचा शोध लावला होता. पूर्वी उरलेल्या चिकनवर उपाय म्हणून त्यांनी ‘मखनी’चा शोध लावला, असा त्यांचा दावा आहे.
गुजराल यांनी हेच काळ्या मसुराला वापरून दाल-मखनीला जन्म दिला. गुजराल यांनी पेशावरमध्ये प्रथम तंदुरी-चिकन नंतर बटर-चिकन आणि दाल-मखनीचा शोध लावला व फाळणीनंतर हे भारतात आणले. दर्यागंज रेस्टॉरंटचे म्हणणे की, ही कल्पना त्यांचे पूर्वज कुंदनलाल जग्गी यांची होती. मोती महलची स्थापना पेशावरमध्ये गुजराल आणि जग्गी यांनी संयुक्तपणे केली होती. त्यामुळे या आविष्कारावर त्यांचा समान अधिकार आहे. वर्षानुवर्षे ही दोन्ही रेस्टॉरंट बटर-चिकन आणि दाल-मखनीचा शोध त्यांनी लावल्याचा दावा करतात; पण, आता हे प्रकरण हायकोर्टात गेले आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी याचिका दाखल करून घेतली आहे.