मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एक व्यक्ती 15 वर्षांपूर्वी वयाच्या 37 व्या वर्षी कामाच्या शोधात बाहेर पडला होता. मात्र नागपूरमध्ये तो त्याच्या साथीदारांपासून वेगळा झाला. त्याच्या मित्रांनी त्याला खूप शोधलं पण तो सापडलाच नाही. यानंतर गावातील लोक गावी परत आले. घरच्यांनीही अनेक वर्षे शोध घेतला, मात्र तो कोणालाच सापडला नाही. यानंतर कुटुंबीयांनी ब्रजलालला मृत मानून तेरावं केलं. आता 15 वर्षांनंतर ब्रजलाल जिवंत असल्याचं समजलं.
ब्रजलाल आता आपल्या घरी परतला आहे. यानंतर कुटुंबीयांना फार आनंद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रजलाल हा बालाघाट येथील नक्षलग्रस्त पोलीस चौकी पाथरी येथील लेहंगाकन्हार ग्रामपंचायत सोमटोला येथील रहिवासी आहे. 15 वर्षांपूर्वी तो आपल्या गावातील काही लोकांसह महाराष्ट्रातील नागपूर येथे मजूर म्हणून गेला होता. तेथे काही दिवस काम केल्यानंतर तो भरकटला.
ब्रजलालला फारसं काही समजत नव्हतं. त्यामुळे इतके दिवस केरळ, छत्तीसगड, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणी भटकल्यानंतर तो झारखंडमधील जमशेदपूरला पोहोचला, तिथे तो आजारी अवस्थेत भटकत होता. जमशेदपूरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करून ब्रजलालच्या राहण्याची व्यवस्था केली.
ब्रजलाल गेल्या 8 महिन्यांपासून जमशेदपूरमध्ये राहत होता. आजारपणातून बरं झाल्यानंतर ब्रजलाल जेव्हा बोलू लागला तेव्हा त्याने त्याविषयची माहिती दिली. त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजातील लोकांशी संपर्क साधला. यावेळी ब्रजलाल हा बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली.
ब्रजलालच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केले. प्रशासनाच्या मदतीने ब्रजलाल घरी परतला आहे. सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. ब्रजलाल आता 52 वर्षांचा आहे. ब्रजलालने नागपुरातील आपल्या मित्रांपासून विभक्त झाल्याची गोष्ट सांगितली आणि आता आपल्या कुटुंबाला भेटून मला खूप आनंद झाला आहे आणि तो पुन्हा कधीही गावाबाहेर जाणार नाही असं म्हटलं आहे.