नवी दिल्ली - खरेतर संसदेची जुनी इमारत ज्या चौसष्ट योगिनी मंदिराच्या रचनेवर आधारित आहे, ते नवी दिल्लीपासून बरेच दूर आहे. विशेष म्हणजे त्यावेळी संसदेत जाऊ इच्छिणारे अनेक उमेदवार मंदिरात दर्शनासाठी येत आणि संसदेत जाण्यासाठी आशीर्वाद मागत होते. मुरैना परिसरात योगिनी मंदिरासारखी अनेक वारसास्थळे असून, ती अद्यापही प्रसिद्धीपासून बरीच दूर आहेत.
चौसष्ट योगिनी मंदिराचा आकार गोलाकार असून ते १०० पेक्षा अधिक खांबांवर उभारण्यात आले आहे. येथे शंकराची ६४ मंदिरे असून त्यात तंत्रशास्त्रातील ६४ योगिनींसह शिवप्रतिमा अस्तित्वात आहेत. २००५ मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले, मात्र ते नंतर रखडले.
राजा देवपाल यांनी १३२३ मध्ये तंत्रसाधना शिक्षण केंद्रासाठी मंदिराचे निर्माणकार्य सुरू केले. त्यावेळी कोणीही कल्पना केली नसेल, की २० व्या शतकात ब्रिटिश वास्तू शिल्पकार एडवर्ड लुटियन हे भारताच्या लोकशाहीचे मंदिर म्हणजेच संसद या मंदिराच्या आराखड्यावर बनवतील.
चंबळ खोऱ्यातील मितावली आणि पढावली परिसरात एक हजार वर्षांपूर्वीची अनेक वारसास्थळे आहेत. परकीय आक्रमणात त्यांची तोडफोड झाली. पुढे या जागी चंबळ खोऱ्यातील डाकूंनी आश्रय घेतल्याने तेथे जाण्यास कोणी धजावत नव्हते. अवैध खाणकाम व स्फोटकांमुळे या ऐतिहासिक वास्तू खिळखिळ्या झाल्या आहेत.
एडवर्ड लुटियन व हर्बर्ट बेकर यांच्या जोडीगोळीने या इमारतींची रचना निश्चित करताना भारतीय आणि पाश्चिमात्य वास्तुकलेचा अभ्यास केला होता. त्यामुळे आजही हे मंदिर जुन्या संसद भवनाची आठवण येते.
निर्मिती कशी?संसद भवनाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली. तत्कालीन व्हाइसरॉय आणि गव्हर्नर-जनरल लॉर्ड इर्विन यांनी १९ जानेवारी १९२७ रोजी संसदेचे उद्घाटन केले. ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी १९१२-१९१३ मध्ये नवी प्रशासकीय राजधानी उभारण्याचा भाग म्हणून या भव्य इमारतीचे डिझाइन तयार केले. भारतीय संसदेला मुळात ‘हाऊस ऑफ पार्लामेंट’ म्हटले जात असे. इमारतीच्या रचनेवरून मतभेदही झाले होते.