अग्निकांडानंतर घरात सापडलेली कोट्यवधीची रक्कम कुणाची? अखेर न्यायमूर्ती वर्मा बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 08:19 IST2025-03-23T08:18:49+5:302025-03-23T08:19:05+5:30

Justice Yashwant Verma News: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं असून, त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ही रक्कम जिथे सापडली, ते स्टोअर रूम आपल्या मुख्य निवासस्थानापासून वेगळं असून, तिथे अनेक लोकांची ये जा सुरू असते, असा दावा त्यांनी केला आहे.

Whose is the crores of rupees found in the house after the fire? Finally, Justice Yashwant Verma spoke, said... | अग्निकांडानंतर घरात सापडलेली कोट्यवधीची रक्कम कुणाची? अखेर न्यायमूर्ती वर्मा बोलले, म्हणाले...

अग्निकांडानंतर घरात सापडलेली कोट्यवधीची रक्कम कुणाची? अखेर न्यायमूर्ती वर्मा बोलले, म्हणाले...

दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा  यांच्या घरातील स्टोअर रूममध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. होळीदरम्यान, लागलेल्या आगीत ही रक्कम जळाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं असून, त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ही रक्कम जिथे सापडली, ते स्टोअर रूम आपल्या मुख्य निवासस्थानापासून वेगळं असून, तिथे अनेक लोकांची ये जा सुरू असते, असा दावा त्यांनी केला आहे.

या घटनेबाबत न्यायमूर्ती वर्मा यांनी दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांना सविस्तर उत्तर पाठवलं आहे. त्यात त्यांनी सांगितले की, १४ मार्च रोजी रात्री होळीच्या दिवशी माझ्या शासकीय निवासस्थानाच्या जवळ असेलल्या स्टोअररूममध्ये आग लागली होती. ही खोली आमचे सर्व कर्मचारी जुनं फर्निचर, बाटल्या, क्रॉकरी, गाद्या, वापरलेले गालिचे, बागकामाचं सामान, आदी ठेवण्यासाठी वापरतात. या खोलीचे दरवाजे कायम उघडे असतात. तिथे मुख्य प्रवेशद्वारातून आणि स्टाफ क्वार्टरच्या मागून प्रवेश करता येतो.

न्यायमूर्ती वर्मा यांनी पुढे सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी आणि माझी पत्नी मध्य प्रदेशमध्ये होतो. तर दिल्ली येथील निवासस्थानी माझी मुलगी आणि वृद्ध आई उपस्थित होती. मध्यरात्रीच्या सुमारासा आग लागली तेव्हा माझ्या मुलीने आणि खाजगी सचिवांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर ही आग शमवण्यात आली. आमच्या कुटुंबातील सदस्य जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा तिथे नोटा किंवा नोटांचे अवशेष सापडले नव्हते.

मी किंवा माझ्या कुटुंबामधील कुठल्याही सदस्याने त्या स्टोअर रूममध्ये कधीही रोख रक्कम ठेवली नव्हती. माझ्यावर होत असलेले आरोप अविश्वसनीय आणि हास्यास्पद आहेत. मी जेव्हा दिल्लीमध्ये परतलो तेव्हा मला या घटनेची माहिती मिळाली. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी मला फोन करून या घटनेची माहिती दिली, तोपर्यंत मला केवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचंच सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, आगीची घटना घडल्यानंतर न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या खासगी सचिवाने माझ्यासोबत जळालेल्या खोलीचं निरीक्षण केलं. तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारची रोख रक्कम सापडली नव्हती. मात्र १६ तारखेला कोर्टाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी  मी मुख्य न्यायाधीश उपाध्याय यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मला दिल्ली पोलिसांनी दिलेला एक व्हिडीओ दाखवला. तो व्हिडीओ पाहून मला धक्काच बसला कारण घटनास्थळावरील दृश्य आणि व्हिडीओत दिसत असलेलं दृश्य एकदम वेगळंच होतं. हा सर्व पप्रकार मला फसवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी आखलेला कट असल्याचा मला संशय आहे. याआधीही सोशल मीडियावरून माझ्या विरोधात अफवा पसरवण्यात आल्या होत्या. ही घटना सुद्धा त्याच कटाचा भाग असल्याचं दिसत आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी पुढे सांगितले की, माझ्या कुटुंबीयांचे सर्व आर्थिक व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून, यूपीआय आणि कार्डच्या माध्यमातून होतात. रोख रकमेच्या देवाण घेवाणीचा प्रश्नच उदभवत नाही. सदर व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या नोटा ह्या मी घटनास्थळी असताना सापडल्या नव्हत्या. 

दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. तसेच न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडे सध्या कुठलंही न्यायालयीन कार्य सोपवलं जाऊ नये, असे आदेश दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना देण्यात आले आहेत.  

Web Title: Whose is the crores of rupees found in the house after the fire? Finally, Justice Yashwant Verma spoke, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.