नवी दिल्ली : १९३ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशास अनुमती देणारा जपानी पासपोर्ट सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरला आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२३ नुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या क्रमवारीतही दोन स्थानांची सुधारणा झाली असून भारत यादीमध्ये ८५ व्या स्थानी आहे.
असे असले तरी गेल्या वर्षी भारतीय पासपोर्ट धारकाला ६० देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवासाची परवानगी होती. पण, यावर्षी ५९ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करता येईल. भारतासह मॉरिटानिया आणि उझबेकिस्तानदेखील ८५ व्या स्थानी आहे.
पाकिस्तानचा खालून चौथा क्रमांक
पाकिस्तान हा जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट असलेला देश आहे. सर्वात शक्तिशाली पासपोर्ट क्रमवारीत पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर आहे. पाकच्या पासपोर्टवर ३२ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. नेपाळ आणि बांगलादेशचा पासपोर्ट पाकपेक्षा चांगला असून ते अनुक्रमे १०३ व १०१ व्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानच्या खाली फक्त सीरिया, इराक आणि सर्वात अखेरीस अफगाणिस्तान १०९ व्या क्रमांकावर आहे.