नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या लढाईत पहिली सुनावणी आज चार वाजता केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू झाली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून एकही नेता निवडणूक आयोगात उपस्थित नव्हता. शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली तर अजित पवार गटाकडून मनिंदर सिंह यांनी जोरदार युक्तिवाद केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाने सर्वात आधी जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला. तसेच, सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यामुळे आम्हीच खरा पक्ष आहोत. शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा सर्वात मोठा आक्षेप अजित पवार गटाने केला. याशिवाय, अजित पवार गटाने आमदारांच्या संख्येचा दाखला देताना नागालँडमधील आमदारांची संख्याही दाखवली. आमच्याकडे 55 आमदार आणि 2 खासदार आहेत, असा दावा अजित पवार गटाने केला.
दुसरीकडे, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आज निवडणूक आगोयामध्ये सुनावणी सुरू असून राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वादावर निर्णय होईपर्यंत हे चिन्हं आमच्याकडेच द्या, ते गोठवू नका अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच, सर्वाधिक अधिकार शरद पवारांकडे त्यामुळे अजित पवार पक्षावर दावा करु शकत नाही. 588 जणांच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड ही शरद पवारांनीच केली होती. राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही, असे सांगत शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह 9 जणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता याबाबतची निवडणूक आयोगातील पहिल्या दिवसाची सुनावणी अखेर संपली आहे. आता पुढची सुनावणी सोमवारी 9 ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजता होणार आहे, अशी माहिती वकील मानिंदर सिंह यांनी दिली आहे.
सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे....
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कुणाला याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी झाली- स्वत: शरद पवार सुनावणीसाठी निवडणूक आयोगात दाखल- शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित - अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी कोणीही उपस्थित नाही - पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निघून गेला, त्यामुळे आमदारांची संख्या हाच महत्त्वाचा मुद्दा - अजित पवार गट- जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर, अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा - पक्षाची स्थापना कशी झाली? पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात अजित पवार गटाचा युक्तीवाद- 55 आमदार आणि 2 खासदारांचा आम्हाला पाठिंबा, अजित पवार गटाचा दावा- महाराष्ट्र विधानसभेचे 53 पैकी 42, विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आणि नागालँडमध्ये 7 पैकी 7 असे 55 आमच्या पाठिशी, तर लोकसभेत 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहे - अजित पवार गट
- शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा सर्वात मोठा आक्षेप अजित पवार गटाने केला. - राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही, शरद पवार गटाकडून युक्तिवाद- मुख्य प्रतोद आमच्या बाजूने, त्यामुळे 9 आमदारांवरील कारवाईचं पत्र बेकायदेशीर - अजित पवार गट - शरद पवारांची अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर- अजित पवार गटाचा मोठा दावा - 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये बैठक. पण त्याच्या आधी 1 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत ते आधीच जाहीर झालं होतं, केवळ औपचारिकता म्हणून 10 सप्टेंबरची निवड झाली का? - अजित पवार गट - अजित पवार गटानं पक्षाची भूमिका पाळली नाही - शरद पवार गट- राज्य आणि बाहेरही पक्ष कुणाचा? सर्वांना माहिती - शरद पवार गट- पक्षाच्या विरोधात अजित पवार गटाची भूमिका - शरद पवार गट- अजित पवार गटाने पक्षाची भूमिका पाळली नाही - शरद पवार गट- एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे - शरद पवार गट- २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा - शरद पवार गट- पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली - शरद पवार गट- शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड पक्ष घटनेला धरून. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष - शरद पवार गट- शरद पवार यांनी घेतलेले निर्णय डावलता येत नाही - शरद पवार गट- शरद पवारांचं नेतृत्व मान्य असं पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे - शरद पवार गट- निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा - शरद पवार गट