कुणाचा स्ट्राइक रेट भारी? ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक; १७ मतदारसंघांतच माेदींच्या प्रचाराला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 10:25 AM2023-05-14T10:25:12+5:302023-05-14T10:26:19+5:30
६६ टक्के स्ट्राइक रेट असलेल्या राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्ट्राइक रेट ४० टक्केच ठरला.
सुनील चावके -
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा दुप्पट जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या यशात राहुल गांधी यांच्या ऐतिहासिक ‘भारत जोडो’ यात्रेला राज्यात मिळालेला जबरदस्त प्रतिसाद निर्णायक ठरला आहे. ६६ टक्के स्ट्राइक रेट असलेल्या राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्ट्राइक रेट ४० टक्केच ठरला.
‘भारत जोडो’ यात्रेने कर्नाटकातील ४८ विधानसभा मतदारसंघांमधून मार्गक्रमण केले. त्यापैकी ३२ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेतील राहुल गांधींच्या यशाचा स्ट्राइक रेट ६६ टक्के ठरला आहे. ‘भारत जोडो’नंतर विधानसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी २२ मतदारसंघांतील जाहीरसभांना संबोधित केले. त्यापैकी १५ मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, तर ७ मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. राहुल गांधी यांचा प्रचारातील यशाचा स्ट्राइक रेट ६६ टक्के ठरला आहे.
२५ जागांवर चालली नाही पंतप्रधान माेदींची जादू -
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण ४२ जाहीरसभा झाल्या. पण त्यांच्या प्रचाराला केवळ १७ विधानसभा मतदारसंघांमध्येच यश मिळू शकले. २५ मतदारसंघांमध्ये मोदींची जादू चालू शकली नाही. त्यांच्या प्रचाराचा स्ट्राइक रेट ४० टक्केच ठरला.
प्रियांकांचाही प्रचार प्रभावी -
मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधींंचा प्रचार प्रभावी ठरला, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तुलनेत काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांचाही प्रचार सरस ठरला. प्रियांका गांधी यांच्या २७ विधानसभा मतदारसंघांमध्ये जाहीरसभा झाल्या. त्यापैकी १० विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळविला, तर १७ मतदारसंघांमध्ये पराभव झाला. त्यांचा स्ट्राइक रेट ३७ टक्के ठरला.
अमित शाह अपयशी -
अमित शाह यांनी ३० विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार केला. पण, त्यापैकी १० मतदारसंघांमध्येच भाजपचे उमेदवार विजय मिळवू शकले. २० मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झाले. अमित शाह यांचा स्ट्राइक रेट अवघा ३३ टक्केच ठरला.