मनाेज मुळ्ये -अमरोह : जिल्ह्यात चारपैकी तीन मतदारसंघांत आमदारकी मिळवणाऱ्या भाजपसमोर आता समाजवादी पक्षाने आव्हान उभे केले आहे. २०१७ चा हा करिश्मा कायम ठेवण्यासाठी भाजपला मतांचे ध्रुवीकरण रोखण्याची गरज आहे. बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस मात्र या मतदारसंघात खूप मागे आहेत. अमरोह जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी ३ भाजपकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची ‘क्रेझ’ आजही येथे कायम आहे. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संघटित गुन्हेगारीवर बरेच नियंत्रण आणले आहे. राम मंदिराचा मुद्दा आजही येथील लोकांसाठी खूप भावनिक आणि जिव्हाळ्याचा आहे.काही गोष्टी भाजपला सकारात्मक असल्या तरी या मतदारसंघात सपाकडून भाजपसमोर आव्हान उभे आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अमरोह विधानसभा मतदारसंघात सपाचे मेहबूब अली २००२ पासून सलग चार वेळा आमदार झाले आहेत. शेतकरी आंदोलनामुळे जाट समाजाची मते मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. या मतांमध्ये मोठा वाटा सपाशी युती असलेल्या राष्ट्रीय लोक दलाचा आहे. त्यामुळे जाट समाजाच्या मतांचा फायदा सपाला होणार आहे. या मतदारसंघातील चारही जागा सपाच लढवत आहे. येथील मुस्लीम वर्ग कायम सपाच्या पाठीशी आहे. त्यामुळे या निवडणुकीत सपाकडून कडवे आव्हान उभे केले जात आहे.
बसप, काँग्रेस गायबच- येथील चार मतदारसंघांत भाजप आणि सपाचीच चर्चा अधिक आहे. - येथे बसपा, काँग्रेस मात्र बाजूलाच फेकले गेले असल्याचे चित्र दिसते.