कोची (केरळ) : कोविशिल्डच्या दोन मात्रांमध्ये (डोस) ८४ दिवसांचे अंतर हे लस उपलब्ध असण्यावर आधारित आहे की लसीच्या परिणामकारकतेवर, असा प्रश्न केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला विचारला. न्यायमूर्ती पी. बी. सुरेश कुमार यांनी किटेक्स गार्मेंटस लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत हा प्रश्न विचारला.
किटेक्स गार्मेंटसने आपल्या कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा देण्याची परवानगी मागितलेली आहे. न्या. सुरेश कुमार म्हणाले की, अंतराचे कारण जर लस उपलब्धतेशी संबंधित असेल तर जे लोक लस विकत घेण्यास सक्षम आहेत (उदा. किटेक्स) त्यांना सध्याच्या शिष्टाचारानुसार ८४ दिवस वाट न बघता दुसरी मात्रा घेण्याची परवानगी दिली जायला हवी.
न्यायालयाने म्हटले की, जर परिणामकारकता हे कारण आहे तर त्याला दुजोरा देणारी शास्रीय आकडेवारीही दिली जायला हवी. केंद्राच्या वकिलाने निर्देश घेण्यासाठी गुरुवारपर्यंतचा वेळ मागून घेतला आहे. आता न्यायालयाने सुनावणी २६ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.