नवी दिल्ली - भारतीय वायू सेनेकडून मध्यरात्री 3.30 वाजता बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर दोन्ही उभय देशांमध्ये वेगवाग घडामोडी सुरू आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावून या हल्ल्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. तर, भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही या हल्ल्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून का आणि कुठे हल्ला केला, याची माहिती गोखले यांनी दिली.
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या हल्ल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला असून भारतीय वायू सेनेकडून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हे हल्ले करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील संघटना जैश ए मोहमद हे भारतीय सैन्यावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच भारतीय सैन्याने हल्ला घडवून त्यांच कंबरड मोडलं आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे अनेक दहशतवादी, कमांडर, ट्रेनी दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मात्र, या हल्ल्यात नागरिकांना कुठलाही त्रास झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.