कोलकाता : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यामध्ये मुस्लिमांचा समावेश का केला गेला नाही, असा प्रश्न पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस यांनी सोमवारी विचारला. बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतण्याचे नातू आहेत. चंद्र कुमार बोस यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा हा जर कोणत्याही धर्माशी संबंधित नाही तर आम्ही हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी आणि जैन यांचाच उल्लेख का करतो आहोत? मुस्लिमांचाही समावेश का केला गेलेला नाही? व्यवहार पारदर्शी असला पाहिजे.’ भारताची तुलना इतर देशांशी केली जायला नको, असे आवाहन बोस यांनी लोकांना केले आणि एक देश म्हणून सगळे धर्म आणि समाजांसाठी तो खुला असला पाहिजे, असे म्हटले.
भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कोलकात्यात या कायद्याच्या समर्थनासाठी मेळावा घेतल्यानंतर बोस यांनी वरील भाष्य केले. बोस यांनी या मेळाव्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, कोलकाताच्या लोकांनी त्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि या कायद्याचे फायदे काय आहेत हे लोकांना समजावून सांगण्यासाठी पक्षात बूथ पातळीवर दबावगट स्थापन केले गेले पाहिजेत.बोस म्हणाले की, ‘जर मुस्लिमांचा त्यांच्या देशात (होम कन्ट्री) छळ केला जात नसेल तर ते येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात काहीही नुकसान नाही. तथापि, हे काही संपूर्ण सत्य नाही. अफगाणिस्तान व पाकिस्तानात राहणाऱ्या बलूचबद्दल काय? पाकिस्तानात राहणाºया अहमदियांबद्दल काय? एका प्रश्नाच्या उत्तरात बोस म्हणाले की, छळ सिद्ध करून दाखवणे हे अशक्य आहे आणि ती गृहीत धरलेली कल्पना आहे. ते सगळ्यांसाठी खुले असले पाहिजे.