नवी दिल्ली : भारतातील राज्य सरकारे निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना विविध गिफ्ट देत असतात. मात्र, याकडे कोणत्याही राजकीय हेतूने पाहिले नाही, तर अनेक निर्णय कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे असतात. असाच एक निर्णय आसाम सरकारने (Assam Government) घेतला आहे. याठिकाणी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Chief Minister Himanta Biswa Sarma) यांची एक घोषणा देशभर चर्चेत आली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची माहिती हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विटद्वारे दिली आहे. कर्मचाऱ्यांना आपले आई-वडील आणि कुटुंबीयांना वेळ देता यावा यासाठी दोन दिवसांच्या विशेष सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. या सुट्ट्या येत्या 6 आणि 7 जानेवारीला देण्यात येत आहेत.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाची आता अंमलबजावणी होणार आहे. "मी आसाम सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवेदन देतो की विशेष सुट्टीच्या रुपात 6 आणि 7 जानेवारीला आपले आई-वडील, नातेवाईकांसोबत वेळ घालवा", असे हिमंत बिस्व सरमा यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.
'या' कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार नाहीविशेषत: आई-वडिलांच्या भेटीसाठीच त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते चौथ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. पण ज्या कर्मचाऱ्यांचे आई-वडील जीवंत नाहीत त्यांना या सरकारी सुट्टीचा लाभ घेता येणार नाही. दरम्यान, राज्यात तैनात असलेले आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते सरकारी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण या सुट्टीचा आनंद लुटू शकतात. पण पोलीस अधिक्षक स्तरावारील पोलीस अधिकारी तसेच फिल्डवर असणारे पोलीस कर्मचारी 6-7 जानेवारीला सुट्टी घेऊ शकणार नाहीत. पण नंतर त्यांना ती सुट्टी मिळू शकेल.