नवी दिल्ली: उत्तर प्रदेशसह ५ राज्यांत निवडणुकीची रणधुमाळी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. त्यामुळे भाजपनं निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. राज्यात भाजपसमोर समाजवादी पक्षाचं आव्हान आहे.
राज्यात पुन्हा एकदा ३०० हून अधिक जागा जिंकून सत्ता कायम राखू, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. उत्तर प्रदेशात भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्व जाती धर्मांसाठी विकासाच्या योजना राबवण्यात आल्या. शेतकरी, तरुण, महिला अशा सगळ्याच वर्गांसाठी सरकारनं उत्तम काम केलं, असं शाह म्हणाले.
यंदाची निवडणूक ८० विरुद्ध २० असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होतेय का, असा प्रश्न शाहांना विचारण्यात आला. त्यावर तसं वाटत नाही. ध्रुवीकरण नक्कीच होतंय. गरीब, शेतकऱ्यांचंदेखील ध्रुवीकरण होत आहे. आम्ही याकडे मतपेढी म्हणून पाहत नाही. योजनांचा लाभ सगळ्यांना मिळावा यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजपनं उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम नेत्याला तिकीट दिलेलं नाही. भाजपच्या या राजकारणामागचं कारण शाह यांना विचारण्यात आलं. त्यावर मुस्लिमांसोबत तेच नातं आहे, जे सरकारचं असायला हवं. निवडणुकीत कोण मतदान करतं, तेदेखील पाहावं लागतं, असं शाह म्हणाले. मुस्लिमांना तिकीट न देणं राजकीय अपरिहार्यता आहे का, असा प्रश्नदेखील शाह यांना विचारला गेला. त्यावर राजकीय शिष्टाचार आहे. सरकार घटनेच्या आधारावर चालतं. देशाची जनता सरकार निवडते, असं उत्तर शाहांनी दिलं.