गुमला/डाल्टनगंज (झारखंड) : १४ पैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असूनही झारखंड राज्य मागास कशामुळे आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. नक्षलवादी समस्या सोडवायची असेल, तर विकास व्हायला हवा आणि खऱ्या विकासासाठी देशातील नैसर्गिक संसाधने लोकांच्या हातात राहायला हवीत़ काँग्रेसने आदिवासी आणि गरिबांना त्यांचा हा अधिकार देण्यासाठी कायम पावले उचलतील, असे सोनिया गांधी रविवारी म्हणाल्या़डाल्टनगंज आणि गुमला येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या़ नक्षल समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित नाही़ राज्यघटनेच्या चौकटीत राहून विकासातून या समस्येला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते आणि देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती सरकारजवळ नव्हे तर लोकांजवळच राहायला हवी़ त्याचमुळे काँगे्रसने आदिवासी, गरीब, दलित, मागासवर्ग आणि अल्पसंख्याकांना जमीन अधिग्रहण कायद्यांतर्गत अधिकार दिले होते़ मात्र, केंद्रातील नव्या भाजपा सरकारने आता या कायद्यात दुरुस्ती करण्याचा घाट घातला आहे़ यास काँग्रेसचा विरोध आहे़झारखंडमधील समस्या आजही कायम असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला़ त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांनी लोकांना सांगायला हवे की, राज्यात १४ वर्षांपैकी ११ वर्षे भाजपाची सत्ता असतानाही समस्या जैसे थे का राहिल्यात? संपुआ सरकार केंद्रात असताना झारखंडमध्ये वीज, रस्ते, पिण्याचे पाणी व आरोग्यसुविधा अशा अनेक योजनांसाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले होते़ मात्र येथील भाजपाशासित सरकारने या निधीचा कुठलाही वापर केला नाही़ भाजपाने १४ वर्षाच्या सत्ता काळात राज्यामध्ये साधी रोजगार निर्मितीही केली नाही. झारखंडमध्ये ४० लाख बीपीएल परिवार आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
भाजपाने सत्ता काळात का केला नाही विकास?
By admin | Published: November 24, 2014 2:08 AM