ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - बंगळुरूमध्ये झालेल्या छेडछाड प्रकरणातील तरुणीने 'मी एकट्याने का फिरू शकत नाही?', असा प्रश्न उपस्थित केला आहे. 'बंगळुरूमध्ये माझा जन्म झाला. मोठ्या भावासोबत एका उदारमतवादी परिवारात मी वाढले. वयाच्या आठव्या वर्षी मला प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य मिळाले, शहरातील गल्ल्यांमध्ये मी संध्याकाळी उशीरापर्यंत खेळ खेळले, डान्स क्लाससाठी प्रवास केला आणि हो हे मी सर्व स्वतःच्या मर्जीने केले', असं या पीडित तरुणीने सांगितले.
'बंगळुरूमध्ये मोठे होतानाचा अनुभव चांगला नाही. अशा अनेक घटना लक्षात आहे की, ज्यावेळी माझा पाठलाग केला गेला, छेडछाड करण्यात आली, फोनवर घाणेरड्या लोकांचे फोन आणि मेसेज आले आणि बरंच काही...', अशा अनुभवलेल्या सर्व वाईट गोष्टी तरुणीने व्यक्त केल्या असून त्या संपात, चीड निर्माण करणा-या आहेत.
'स्वातंत्र्यासोबत मी स्वरक्षणाचेही धडे घेतले आहेत, मी मिक्स्ड मार्शल आर्ट्स शिकले असून स्थानिक भाषाही शिकले आहे, मात्र जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा यापैकी कोणतीही गोष्ट कामी येत नाही', असंही पीडित तरुणीने सांगितलं आहे.
'शहरातील पुरुष असे स्वतःला असे समजतात, की ते काहीही करू शकतात. काही दिवसांपूर्वी महिला ड्रायव्हरसोबत ज्याप्रकारे पुरुषांनी वर्तन केले त्यावरुन हे मत पक्क झाले आहे. माझ्यासोबतही एक छोटीशी घटना घडली. चारही बाजूंनी मला काही जणांनी घेरले, यात लोकांनी मलाच दोषी ठरवले. त्यांनी काहीही पाहिले नाही, तरिही मला चुकीचे ठरवले. ही घटना माझ्या कॉलेज परिसरात घडली होती', अशी आठवण तिने सांगितली.
'मी हेदेखील अनुभवले आहे की, एकट्या तरुणीला लोकांनी घेरले तर तिचे चांगले मित्रही काही करु शकत नाहीत. दरम्यान जोपर्यंत महिलेला पुरुषाकडून मदत मिळत नाही तोपर्यंत लोक तिला कस्पटासमान समजतात'.
'पोलिसांकडूनही काही खास मदत होत नाही, त्यांनी मला सांगितले की हे प्रकरण मिटवून टाका', असा आरोपदेखील पीडित मुलीने केला आहे. दरम्यान, कॉलेज परिसरातील घटना दिवसाढवळ्या घडली होती, असेही तिने सांगितले.
बंगळुरू शहरातील लोकं जास्त हिंसक होत आहेत, असेही तिने म्हटले. महिलांचा धाडसीपणा पुरुषांना आक्रमक बनवत असून ते महिलांना स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये काही समानता नाही, अशी खंतही तिने व्यक्त केली आहे.
सरकार, आमचं कुटुंब आणि नागरिकांनी बदल होतो यावर विश्वास ठेवत या वाईट प्रवृत्तींचा नाश करणे गरजेचे आहे. पुरुषांनी आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्याची गरज आहे. लैंगिक समानतेचं महत्व सांगणारं शिक्षण देणंही गरजेचं असल्याचं या तरुणीने सांगितलं आहे.