नवी दिल्ली - हरियाणाच्या कर्नालमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आला याचा काँग्रेसने (Congress) निषेध केला आहे. "तालिबानशी चर्चा करणारे नरेंद्र मोदी सरकार (Modi Government) देशातील शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही?" असा बोचरा सवालही काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवावं आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. गेल्या 10 महिन्यांपासून गांधीवादी मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना जाणूनबुजून भडकवून आणि आपापसात लढवण्याचा कट रचत आहे असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
"हा कट इथेपर्यंतच मर्यादित नाही. तर जवान आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपवून देण्याचं षड्यंत्र रचलं आहे. कर्नालमध्ये हजारो शेतकऱ्यांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला गेला. पण शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही" असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तसेच मोदीजी, तुम्ही दोहामध्ये (कतार) तालिबानशी चर्चा करू शकतात. तर मग दिल्लीच्या सीमेवर दहा महिन्यांपासून बसलेल्या अन्नदातांशी बोलत का नाही? हा सत्तेचा अहंकार कशासाठी?, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना आपलं पिक आणि आपली पुढची पिढी वाचवायची आहे. पण मोदीजी आपल्या उद्योगपती मित्रांची तिजोरी भरत आहेत. ही लढाई देश वाचवण्यासाठी, जेणेकरून मोदी सरकार ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे देशाला गुलाम बनवू शकत नाही, असं सुरजेवाला म्हणाले.
"शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा"; भाजपाचा गंभीर आरोप
नरेंद्र मोदींनी कामं सोडून शेतकऱ्यांची चर्चा करावी. मोदी स्वतः शेतकऱ्यांशी बोलावं आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करावी, असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजपाने मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायत' नाही तर 'निवडणूक सभा' होत असल्याचं म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप देखील भाजपाने केला आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये रविवारी 'किसान महापंचायत' आयोजित केली होती. यामध्ये उत्तर प्रदेश आणि शेजारी राज्यांमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. भाजपाने यावरून जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला. "शेतकऱ्यांची चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा" असल्याचं म्हटलं.
"उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी (Rakesh Tikait) पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपापेक्षा घातक कोणताच पक्ष नाही असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सिरसामध्ये ते बोलत होते. तसेच टिकैत यांनी य़ाच दरम्यान एक वादग्रस्त विधान देखील केलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांआधी (Uttar Pradesh Election) एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते असं म्हटलं आहे. हरियाणाच्या सिरसामध्ये शेतकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी भाजपा सरकारवर गंभीर आरोप केला.