तरीही चीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक का करतोय? राहुल गांधी यांनी उपस्थित केली अतिगंभीर शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:18 PM2020-06-22T19:18:05+5:302020-06-22T19:27:58+5:30
गलवान खोऱ्यात झालेल्या चीनच्या घुसखोरीवरून आक्रमक झालेले राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले असून, त्यांच्याबाबत अतिगंभीर शंका उपस्थित केली आहे.
नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले आरोपप्रत्यारोपांचे सत्र अतिगंभीर रूप घेण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चीनच्या घुसखोरीवरून आक्रमक झालेले राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले असून, त्यांच्याबाबत अतिगंभीर शंका उपस्थित केली आहे. चीन आमच्या जवानांची हत्या करत आहे. त्यांचे सैनिक आमची जमीन बळकावत आहेत आणि तरीही चीनमधील प्रसारमाध्यमे आमच्या पंतप्रधानांचे कौतुक का करत आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
गलवानमधील घुसखोरीवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज सकाळपासूनच घेरले असून, सकाळी माजी पंतप्रधान महमोहन सिंग यांनी मोदींना खडेबोल सुनावल्यानंतर आता संध्याकाळी राहुल गांधी यांनी एका वृत्ताचे कात्रण शेअर करून मोदींबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या विधानावरून चिनी प्रसारमाध्यमांनी तणावपूर्ण परिस्थितीतही त्यांचे कौतुक केले होते. त्यावरूनच राहुल गांधी आता आक्रमक झाले आहेत.
China killed our soldiers.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2020
China took our land.
Then, why is China praising Mr Modi during this conflict? pic.twitter.com/iNV8c1cmal
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी मोदींना उपदेशाचे डोस पाजले होते. शब्दांची निवड करताना काळजी घेण्याचा सल्ला सिंग यांनी दिला होता. तसेच आपल्या वक्तव्यांमधून चीनच्या कटकारस्थांनाना बळ मिळता कामा नये असे सांगितले होते, आता राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांचे ते विधान ट्विटरवर शेअर केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी मनमोहन सिंग यांचा सल्ला विनम्रतेने ऐकतील, असे म्हटले होते.
पंतप्रधानांनी आपले शब्द, घोषणा करताना देशाची सुरक्षा, सामरिक आणि भूभागीय हितसंबंधांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला होता.