नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच नवनवीन उपक्रमांच्या माध्यमांतून देशातील तरुणाईला प्रोत्साहित करत असतात. मोदींनी आज देशातील प्रोबेशनर्स आयपीएस अधिकाऱ्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला. यावेळी, त्यांना मार्गदर्शन करताना त्यांचे विचारही ऐकले. या कार्यक्रमादरम्यान, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला मोदींनी डॉक्टरकी सोडून पोलीस प्रशासन सेवेत येण्याच्या निर्णयासंदर्भात प्रश्न विचारला होता.
हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीत हे सर्व IPS प्रोबेशनर्स उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी अनेक अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी डॉक्टर असलेल्या एका महिला IPS अधिकाऱ्याला प्रश्न विचारला. त्यावर, महिला पोलिस अधिकाऱ्यांनेही अतिशय आदर्शवत उत्तर दिलं. दातांच्या वेदानापासून नागरिकांना मुक्ती देण्यासाठी आणि दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही डेंटल सर्जरीत पदवी मिळवली. मग, देशाच्या शत्रूंचा सामना (दुश्मनो के दांत खट्टे करने का) करण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारला होता.
पंतप्रधान मोदींच्या प्रश्नावर डॉ. सीमी यांनी प्रेरणादायी उत्तर दिलं. सुरुवातीपासूनच नागरी सेवांकडे माझा कल होता. एक डॉक्टर आणि एक पोलीस अधिकारी या दोघांचेही काम लोकांच्या वेदना दूर करणं हेच आहे. त्यामुळे मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आपलं योगदान देण्याचा निर्णय केला, असं उत्तर डॉक्टर नवज्योत सिमी यांनी दिलं. डॉ. सीमी यांच्या उत्तराने मोदींनीही हसत त्यांचं कौतुक केलं.
डॉक्टर नवज्योत सिमी या दातांच्या डॉक्टर आहेत. त्यांनी त्यातच पदवी मिळवली आहे. डॉक्टर सिमी यांनी पंतप्रधान मोदींना आपली ओळख करून दिली. आपण पंजाबमधील गुरुदासपूर येथील असून बिहारमध्ये आपली नियुक्ती झाली आहे. लुधियानामधून मी डेंटल सर्जरीत पदवी मिळवली. पाटणामध्ये आपले जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाले. यावेळी महिला पोलिसांची वाढती संख्या आणि त्यांच्या साहसाने मला खूप प्रेरणा मिळाली, असेही डॉ. सिमी यांनी सांगितले.