Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशातील मंडीमधून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला जवानाने मारहाण केल्याचे समोर आलं आहे. कंगनाने गंभीर आरोप केले असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिला जवानाचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता या महिला अधिकाऱ्याने कंगनाला का थप्पड मारली याचे कारण समोर आले आहे. याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली
थप्पड मारल्याचा आरोप असलेल्या CISF महिला जवानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महिला CISF कर्मचारी काय म्हणतेय त्यावरून स्पष्टपणे दिसत आहे की, शेतकरी आंदोलनाबाबत कंगना राणौतच्या जुन्या विधानावरुन तिने थप्पड मारली असल्याचे दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही सीआयएसएफ महिला जवान बोलत आहे की, 'शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन बसायच्या, असे कंगनाने सांगितले होते. माझी आई पण तिथे होती, असंही ती महिला जवान सांगत आहे.
खासदार कंगना रणौतने दिलेल्या तक्रारीनुसार, कंगना चंदीगड विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा तपासणीनंतर ती बोर्डिंगसाठी जात असताना एलसीटी कुलविंदर कौर (सीआयएसएफ युनिट चंदीगड विमानतळ) या महिला जवानाने कंगना यांना थप्पड मारली. त्यानंतर कंगना राणौतसोबत प्रवास करणाऱ्या मयंक मधुर यांनी कुलविंदर कौर यांना थप्पड मारण्याचा प्रयत्न केला.
महिला सीआयएसएफ जवान निलंबित
यासोबतच सीआयएसएफ महिला जवानाला निलंबित करून तिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी सुरू असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, सीआयएसएफ महिला जवानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये ती कंगना राणौतच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत आहे.