तुमकुरु - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसला लक्ष्य केलं आहे. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष सीएए कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. संसदेने हा ऐतिहासिक कायदा पारित केल्यानंतर देशात याविरोधात आंदोलन उभारलं जात आहे. मग हे लोक पाकिस्तानातून आलेले दलित, मागासवर्गीय आणि अत्याचाराने पीडित लोकांसाठी रस्त्यावर का उतरले नाहीत असा सवाल त्यांनी केला.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानातून आलेल्या दलित, मागासवर्गीय आणि अत्याचाराने पीडित लोकांविरोधात हे आंदोलन सुरु आहे. पाकिस्तानचा जन्म धर्माच्या आधारावर झाला होता. तेव्हापासून दुसऱ्या धर्मातील लोकांवर अत्याचार सुरु आहेत. दिवसेंदिवस पाकिस्तानात हिंदू, सिख, जैन, बौद्ध आणि ईसाई यांच्यावर अत्याचार वाढत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच लाखो लोकांना पाकिस्तानातून त्यांचे घर सोडून भारतात यावं लागलं. पाकिस्तानात या लोकांवर अन्याय झाला, काँग्रेस पाकिस्तानच्या विरोधात नाही तर अत्याचार पीडित लोकांच्या विरोधात आंदोलन करत आहे. शरणार्थी आलेल्या लोकांच्याविरोधात मोर्चे काढत आहेत. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार त्याच्याविरोधात काँग्रेस मूग गिळून गप्प का आहे? पाकिस्तानातील शरणार्थींना मदत करणं भारताचं कर्तव्य आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
दरम्यान, जे लोक संसदेच्याविरोधात आंदोलन करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की, पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची ही वेळ आहे. आंदोलन करायचं असेल तर पाकिस्तानच्या मागील ७० वर्षाच्या कारनाम्यावर करा असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमकुरुमध्ये सभा घेतली. या सभेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता (डिसेंबर 2019 ते मार्च 2020)चा शुभारंभ केला. तसेच कर्नाटकला कृषी कर्मण पुरस्कार देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनूसार (पीएमओ) किसान सन्मान निधी योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा लाभ देशातील सहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून एकूण 12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.