सध्या सगळीकडे ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, ऑनलाईन जेवण ऑर्डर केल्यानंतर काही ग्राहकांना मनस्ताप झाल्याचेही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता असाच एक प्रकार कर्नाटकातील धारवाड येथे घडला आहे. झोमॅटोवर मोमोज ऑर्डर करूनही डिलिव्हरी मिळाली नाही. त्यामुळे एका महिलेला मनस्तापाला सामोरे जावे लागले. मात्र, याप्रकरणी ग्राहक मंचाने डिलिव्हरी कंपनीला दंड ठोठावत संबंधित महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोला (Zomato) ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विषेश म्हणजे १३३ रुपयांचे मोमोज ग्राहकाला दिले नाही. त्यामुळे कर्नाटकातील धारवाडच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहक मंचाने कंपनीला दंड ठोठावताना म्हटले आहे की, यामुळे याचिकाकर्त्या महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
याबाबत याचिकाकर्त्याने कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे महिलेने ग्राहक मंचात याचिका दाखल केली. महिलेने ग्राहक मंचात तक्रार करण्यापूर्वी झोमॅटोला आपल्या समस्येबद्दल माहिती दिली होती. यानंतर महिलेला कंपनीने ७२ तासांत निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महिलेने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
सुनावणीदरम्यान झोमॅटोचे वकील जीएम कंसोगी यांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले. वकील म्हणाले की, रेस्टॉरंट आणि डिलिव्हरी एजंटशी त्यांचा कोणताही कायदेशीर संबंध नाही. यावर ग्राहक मंचाने सांगितले की, ७२ तासांनंतरही झोमॅटोकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, ज्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण होते. त्यामुळे ग्राहक मंचाने झोमॅटोला मोमोज न दिल्याने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, याचिकाकर्त्याला मानसिक ताण दिल्याबद्दल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी याचिकाकर्त्या महिलेने झोमॅटोच्या माध्यमातून मोमोज ऑर्डर केले होते. यासाठी तिने Google Pay द्वारे १३३.२५ रुपये दिले. यानंतर महिलेला फूड डिलिव्हरी झाल्याचे नोटिफिकेशन आले. मात्र, प्रत्यक्षात डिलिव्हरी तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर महिलेने रेस्टॉरंटशी संपर्क साधला असता डिलिव्हरी एजंट त्यांची ऑर्डर घेऊन निघून गेल्याचे सांगण्यात आले.
यानंतर महिलेने झोमॅटोच्या वेबसाइटद्वारे डिलिव्हरी एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेनंतर महिलेने झोमॅटोला तक्रार करण्यासाठी ईमेल केला आणि ७२ तास प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले, परंतु त्यानंतरही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिलेने १३ सप्टेंबर २०१३ रोजी झोमॅटोला कायदेशीर नोटीस पाठवली.