- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी २५ मे रोजी अध्यक्षपद सोडल्यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत सस्पेन्स कायम आहे. अर्थात, कार्यकारी अध्यक्ष निवडीसाठी याच आठवड्यात कार्यकारी समितीची बैठक होणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. तथापि, राहुल गांधी हे अमेरिकेला गेले होते आणि गुरुवारी ते राजधानी दिल्लीत परतले आहेत. तरीही, कार्यकारी समितीच्या बैठकीबाबत कोणतेही संकेत नाहीत.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडब्ल्यूसीची बैठक लवकर होऊ शकत नाही. सूत्रांनी सांगितले की, कार्यकारी अध्यक्षांच्या निवडीसाठी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोणतीही घाई नाही. राहुल गांधी यांना राजीनाम्यावर विचार करण्यासाठी त्या पर्याप्त वेळ देऊ इच्छितात. त्यांना असे वाटते की, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी हे पद सोडले तेव्हा ते रागात होते. त्यावेळी राहुल गांधी हे नाराज होते. निवडणुकीत पक्ष किमान १५० जागा जिंकेन असा त्यांना विश्वास होता. त्यांचा अंदाज डेटा अॅनालिसिस हेड प्रवीण चक्रवर्ती यांच्या आधारावर होता. ‘चौकीदार चोर है’चा नारा यशस्वी असल्याचा विश्वासही त्यांनी दाखविला होता.अनेक राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना असा विश्वास दिला होता की, पक्षाला संबंधित राज्यात चांगल्या जागा मिळतील. याच कारणामुळे सीडब्ल्यूसीच्या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या काळातही या पदाबाबत सस्पेन्स कायम आहे.