नवी दिल्ली- कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये धुरके (स्मोग) चा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. धूर आणि धुके एकमेकांमध्ये मिसळले की या प्रकारचे धुरके तयार होते. राजधानी क्षेत्रामध्ये गाड्यांमुळे होणारे प्रदूषण यासाठी कारणीभूत असल्याचे वरवर वाटत असले तरी याची मुख्य कारणे वेगळीच आहेत.
1) दिल्ली राजधानी क्षेत्र हे राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांनी वेढलेले आहे. या राज्यांमध्ये नवे पिक घेण्यासाठी शेतजमिनीवरच आधीच्या पिकाचे पाचट आणि इतर तण जाळले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि परिणामी सर्वच क्षेत्राची हवा प्रदुषित होते. मागील वर्षी दिल्ली हायकोर्टाने या राज्यांना ही शेतजमिनीवर गवत, पाचट जाळण्याची पद्धती बंद करावी अशा अत्यंत कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन न झाल्यास संबंधित राज्याच्या मुख्य सचिवाला जबाबदार धरू असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. यावरुनच दिल्लीची हवा प्रदुषित करण्यामध्ये याचा किती मोठा हात आहे ते समजते. दिल्लीमधील वाहने प्रदुषणास हातभार लावतात हे खरे असले तरी त्यापेक्षाही जास्त प्रदुषण हे शेतजमिनीवर गवत जाळण्यामुळे होते. या शेतकऱ्यांना गवत, पाचट जाळण्यापासून परावृत्त केले तरच दिल्लीच्या हवेमध्ये सुधारणा होऊ शकते.
2) राजधानी दिल्लीचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. रस्ते, मेट्रो तसेच गृहप्रकल्पांची येथे सतत बांधणी सुरु असते. या प्रकल्पांमध्ये खोदकाम तसेच जमिनीखाली होणारे बांधकाम (बोगदे काढणे) यांचाही समावेश आहे. त्यामुळे सतत बारिक धूळ निर्माण होऊन नव्या प्रदुषकांची निर्मिती होत राहते.
3) जमिनी जाळणे, बांधकाम यांच्याबरोबर प्रदुषणात भर घालणारे एक कारण म्हणजे कचराभूमी (डम्पिंग ग्राऊंड). दिल्ली शहरामध्ये दररोज लाखो टन कचरा तयार होतो. त्यात औद्योगिक, घरगुती, हिरवा, वैद्यकीय, जैविक, रासायनिक कचऱ्याचा समावेश असतो. या कचऱ्यातून अनेक प्रकारचे वायू बाहेर पडतात. तसेच रसायनांमुळे कचऱ्याचे तापमान वाढून आग लागण्याचा धोका संभवतो. कचऱ्यामध्ये मिथेन वायू तयार होतो आणि तो ज्वलनशील असल्यामुळे कचरा पेटतो. दिल्लीमधील कचराभूमींमध्ये अनेक आठवडे आग धूमसत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी कचरा अपघाताने किंवा मुद्दामही पेटवला जातो. त्यामुळे शहराच्या सीमावर्ती प्रदेशात असणाऱ्या कचराभूमींमधून सतत प्रदुषणाची निर्मिती होत राहते.