वायनाड (केरळ) : भाजप आदिवासी समुदायांना जंगलापुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना आदिवासीऐवजी वनवासी संबोधून जमिनीचे मूळ मालक म्हणून त्यांचा दर्जा नाकारत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
भाजप आदिवासी समाजाला आदिवासीऐवजी वनवासी संबोधून त्यांचा अपमान करते आणि त्यांची वनजमीन उद्योगपतींना देण्यासाठी हिसकावून घेते, असा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये पक्षाच्या एका रॅलीत केला होता. त्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा केला. नल्लूरनाड येथील डॉ. आंबेडकर जिल्हा मेमोरियल कॅन्सर सेंटर येथे एचटी कनेक्शनचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
आदिवासींना शिक्षण, नोकऱ्यांची संधी द्या
- राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही (आदिवासी) जमिनीचे मूळ मालक आहात, हे नाकारणे आणि तुम्हाला जंगलापुरते मर्यादित करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही जंगलातील आहात आणि जंगल सोडू नये, ही कल्पना आहे.
- वनवासी हा शब्द आदिवासी समाजाच्या इतिहासाची आणि परंपरेची विकृती आहे. आमच्यासाठी (काँग्रेस) तुम्ही आदिवासी आहात, जमिनीचे मूळ मालक आहात. आदिवासींना शिक्षण, नोकऱ्या, व्यवसाय इत्यादी सर्व संधी दिल्या पाहिजेत.
आज पर्यावरण शब्द फॅशनमध्ये आला आहे. आधुनिक समाज पर्यावरणाची हानी करत आहे. जंगले जाळली जात आहेत, प्रदूषण पसरत आहे. तुमचा इतिहास, जीवनशैली यातूनही आपण शिकू शकतो. - राहुल गांधी, काँग्रेस नेते.