एआयएडीएमकेने 25 सप्टेंबरला भाजपसोबतची युती संपुष्टात आणण्याची घोषणा करत स्वतःला एनडीएपासून वेगळे केले आहे. हा पक्ष गेल्या चार वर्षांपासून भाजपसोबत युतीत होता. आता एआयएडीएमकेच्या एका माजी मंत्र्याने युती तुटण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील इरोड येथे एआयएडीएमकेचे माजी मंत्री केसी करुप्पनन म्हणाले, ''भाजप 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूतील भाजप नेते के अन्नामलाई यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून स्वीकार करण्यासाठी दबाव टाकत होते, यामुळे एआयएडीएमकेने भाजपसोबतची युती तोडली."
केसी करुप्पनन यांनी तामिळनाडूतील भाजप अध्यक्ष के अन्नामलाई यांच्यावर निशाना साधत, ''के अन्नामलाई यांनी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर टीका केली. आम्ही आमच्या पक्षाच्या संस्थात्मक नेत्यांवरील टीका कशी सहन करू शखतो? यामुळे एआयएडीएमकेने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडत आहोत. या निर्णयावर आम्ही ठाम आहोत.''
एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व्यक्त केला आनंद - एआयएडीएमकेचे प्रमुख ईके पलामिस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात 25 सप्टेंबरला एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, तसेच अधिकाऱ्यांनी युतीच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि भाजपपासून वेगळे होण्याचा ठराव मंजूर केला. एवढेच नाही, तर भाजपपासून वेगळे झाल्याचा एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनीही आनंद साजरा करत पक्षाच्या मुख्यालयाबाहेर फटाकेही फोडले होते.