आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केजरीवाल म्हणाले की, 'आप' सरकारने दहा वर्षे प्रामाणिकपणे दिल्लीतील जनतेची सेवा केली. या काळात अशी अनेक कामं झाली जी देशातील इतर कोणत्याही सरकारने केली नाहीत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जनतेला भारतीय जनता पक्षाला (भाजपा) मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.
दिल्लीमध्ये भाजपाची सत्ता आल्यास आप सरकारच्या मोफत वीज, आरोग्य सेवा, शिक्षण आणि महिलांसाठी बस प्रवासाच्या योजना बंद होतील, असा दावा त्यांनी केला. तसेच "तुम्ही भाजपाला मत दिल्यास, तुम्ही तुमची बिलं भरायची की तुमच्या मुलांची काळजी घ्यायची हे पाहावं लागेल."
"शून्य वीज बिल आता दिल्लीकरांसाठी सामान्य गोष्ट आहे, आप सत्तेत येण्यापूर्वी, वीज बिल १० हजार रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. सत्तेत आल्यानंतर, मी मार्चमध्ये ही 'वाढीव' पाणी बिलं माफ करेन" असंही केजरीवालांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधीच अरविंद केजरीवाल सतत पदयात्रा करत आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, भाजपाचे नेते वीरेंद्र सचदेवा यांनी दावा केला की, अरविंद केजरीवाल यांना माहीत आहे की, त्यांचा पक्ष आगामी निवडणुकीत हरणार आहे. ते आपल्या सरकारच्या योजनांबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.