ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 30 - उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री स्वाती सिंह यांचे बिअर बारचे उदघाटन करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर योगी सरकारवर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. भाजपा सरकारचा हाच खरा चेहरा आहे का ? असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्वाती सिंह यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
फोटोमध्ये स्वाती सिंह रिबिन कापून बिअर बारचे उदघाटन करताना दिसत आहेत. त्यांच्याबाजूला उभ्या असणा-या लोकांमध्ये अधिका-यांचाही समावेश आहे. स्वाती सिंह यांनी 20 मे रोजी या बारचे उदघाटन केले. त्या दयाशंकर सिंह यांच्या पत्नी आहेत. बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरल्याबद्दल दयाशंकर सिंह यांना भाजपामधून निलंबित करण्यात आले होते.
या संपूर्ण वादावर स्वाती सिंह यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. या निमित्ताने विरोधकांना योगी सरकारवर वार करण्याचीआयती संधी मिळाली आहे. या कृतीतून सत्ताधारी भाजपामधला विरोधाभास दिसून येतो. तो बोलतात एक पण करतात दुसरेच अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केली. या घटनेने भाजपाची कृती, चरित्र आणि चेहरा उघडा पाडला अशी टीका काँग्रेसचे नेते दिविजेंद्र त्रिपाठी यांनी केली.
भाजपाचे नेते दारुबंदीबद्दल बोलतात पण त्यांचे मंत्री उदघाटनाला जातात. त्या बारला परवाना आहे किंवा नाही ते ही अजून स्पष्ट नाही अशी टीका त्रिपाठी यांनी केली. दरम्यान योगी सरकारवर महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन आधीच टीका सुरु असताना या नव्या वादामुळे अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात 14 तरुणांनी मिळून दोन तरुणींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. इतकंच नाही तर या तरुणांनी मुलींची छेड काढतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईल फोनवर शूट करत सोशल मीडियावरही अपलोड करुन टाकला. लखनऊपासून 318 किमी अंतरावर असणा-या रामपूर जिल्ह्यात ही लाजिरवाणी घटना घडली. हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र रविवार रात्रीपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी 14 तरुणांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे.