कॅप्टन अमरिंदर सिंग यांना का सोडावे लागले मुख्यमंत्रीपद? जाणून घ्या, पंजाबमधील राजीनामानाट्यामागची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 10:08 AM2021-09-19T10:08:01+5:302021-09-19T10:08:22+5:30
अमरिंदर सिंग यांचा विराट कोहली झाला? स्वाभिमान दुखावला? पाच कारणे.. जे ठरले सिनेमाचे मुख्य प्लॉट...
पवन देशपांडे -
कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणजे राजेशाही थाट... हवेलीस्टाईल बाज आणि ठाकूरस्टाईल वागणूक... तुम्ही असाल कोणीही... मी मुख्यमंत्री आहे... हा रुबाब... असा त्यांचा वावरच त्यांच्या राजीनाम्यामागील एक कारण बनले... अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्यामुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला... हा या पंजाबी सिनेमाचा क्लायमॅक्स असला तरी त्याची स्क्रिप्ट तशी लिहिल्या जाण्यालाही खुद्द कॅप्टनच जबाबदार असल्याचे बोलले जाते.
अमरिंदर सिंग यांचा विराट कोहली झाला?
- निवडीवरून मदभेद, कोणाचं डिमोशन करायचं, कोणाला वरती आणायचं... असा जो काही खेळ सध्या क्रिकेट टीम इंडियामध्ये सुरू आहे, तोच खेळ पंजाबमध्ये पाहायला मिळाला. या खेळात कॅप्टन विराट कोहलीचीच विकेट गेली आणि त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. (किंवा सोडावे लागले.)
- हाच संपूर्ण डाव पंजाब काँग्रेसमध्येही गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. विराट कोहली ज्या भूमिकेत त्याच कॅप्टन अमरिंदर सिंगही होते. अंतर्गत कलह आणि राजकीय डावपेचांमध्ये सिद्धू कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर भारी पडले.
- या सामन्यात सिद्धू यांनी विजय मिळवल्याचे दिसत असले तरी चक्र काय फिरतील, हे काळच ठरवेल.
स्वाभिमान दुखावला?
दोन महिन्यांत तीन वेळा आमदारांची बैठक बोलवण्यात आली आणि आपण सरकार चालवण्यास सक्षम नसल्याचा संशय घेतला गेला, असं मत कॅप्टन अमरिंदर यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केलं. त्यातून हेच दिसून आले की गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमधील घडामोडींमुळे कॅप्टन दुखावले गेले. त्याचा कडेलोट झाला, तेव्हा त्यांनी पद सोडले. जाता जाता त्यांनी राजकीय 'पर्याय' उपलब्ध असल्याचे स्पष्ट करून नवी मेख मारली आहे.
पाच कारणे.. जे ठरले सिनेमाचे मुख्य प्लॉट -
- पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणे त्यांनी कायम टाळले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
- ते विरोधकांशी मिळालेले आहेत, अशी शंकाही कायम घेतली गेली.
- कॅप्टन बहुतेक वेळा महाराजा स्टाइलने काम करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी संपर्क करणेही अवघड झाले होते.
- आमदारांचं म्हणणे ऐकण्याऐवजी त्यांनी अनेकदा सल्लागारांचे ऐकले, हाही आरोप त्यांच्यावर ठेवला गेला.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू यांची एंट्री. त्यांनी कॅप्टन सिंग यांचा पूर्णच गेम पलटवला.
सिद्धूंची एंट्री आणि पंजाब काँग्रेसमध्ये झाले मोठे बदल... -
नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून पंजाब काँग्रेसमध्ये धुसपूस सुरू झाली आहे. सिद्धू सेलिब्रिटी आहेत, त्यांचा पक्षाला फायदा होईल असे तेथील आमदारांनाही वाटू लागले आहे. सिद्धू यांना अमरिंदर सिंग यांनी कॅबिनेटमंत्रीपद दिले होते, पण त्यावर ते खुश नव्हते.
त्यांनी विरोधाची धार तीव्र केल्यानंतर अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असेलेल पक्षातीलच नेते आणि आमदार सिद्धू यांच्या टीममध्ये दाखल झाले. त्यांनी अमरिंदर सिंग यांच्या विरोधाला हवा देण्यास सुरूवात केली. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अमरिंदर सिंग नाराज होते. त्यानंतर या दोघांमधील महत्त्वाकांक्षेचे युद्ध टोकाला पोहोचले.