दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनंतर राजीनाम देणार असल्याची घोषणा केल्यानंतर, राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच, त्यांनी राजीनाम्यासाठी दोन दिवसांचा वेळ घेतल्यावरून विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर आता दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. त्या पत्रकारांसोबत बोलत होत्या.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ का हवा आहे? असा प्रश्न केला असता दिल्लीच्या मंत्री आतिशी म्हणाल्या, "आज रविवार आहे, उद्या ईद-ए-मिलादची सुट्टी आहे. यामुले पुढचा कामकाजाचा दिवस मंगळवार आहे. यामुळे दोन दिवसांचा वेळ घेण्यात आला आहे.''
दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? - यापूर्वी, आतिशी यानी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याबद्दलच्या चर्चांवरही उत्तर दिले. त्या म्हणाल्या, "आमच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होईल, त्यात पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय होईल. नोव्हेंबरमध्ये निवडणुका व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. आम्हाला जनतेचा निर्णय हवा आहे. आम्हाला जनतेचा निर्णय अत्ताच हवा आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, आता अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या जनतेचा निर्णय हवा आहे. दिल्लीचे लोक काय विचार करत आहेत? अरविंद केजरीवाल प्रामाणिक आहेत, यावर दिल्लीच्या जनतेला विश्वास आहे की नही? हे त्यांना जाणून घ्यायचे आहे.