नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यासोबतच PM मोदींनी MSP अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचंही सांगितलं. या समितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींशिवाय शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अर्थतज्ज्ञ असतील. दरम्यान, इतक्या दिवसानंतर केंद्राने कृषी कायदे परत घेण्याचा निर्णय का घेतला ? आम्ही तुम्हाला काही मुद्द्यांमधून सांगणार आहोत, यामागचे कारण...
पंतप्रधान मोदींच्या निर्णयामागील कारण
1. राष्ट्रहितासाठी निर्णय घेतला: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय हितासाठी तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींनी वैयक्तिक आणि पक्षहिताऐवजी राष्ट्रहिताचा निर्णय घेतला. देशातील शेतकरी मागील एका वर्षापासून आपले सर्वस्व पणाला लावून आंदोलन करत होते, त्यांच्या या आंदोलनाला संपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
2. भारतविरोधी घटक फायदा घेत होते: दुसरे कारण म्हणजे, भारतविरोधी घटक तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या निदर्शनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. अशा घटकांना समुदायांमध्ये तेढ निर्माण करायचा होता आणि त्यांना भारताचे कधीही भरून न येणारे नुकसान करायचे होते. आंदोलनादरम्यान देशात विविध ठिकाणी अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या, यात अनेकांचा बळी गेला. कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले, त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.
3. राजकीय कारण: पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही मोठी राजकीय खेळी होऊ शकते. यूपीमधील विधानसभा निवडणुकीत जाट समाजाला, विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशातील, त्यांच्या पक्षात ठेवण्यासाठी याची गरज होती. गेल्या निवडणुकीत जाट समाजाने जवळपास एकदिलाने भाजपच्या बाजूने मतदान केले होते. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत हे मत विरोधकांच्या बाजूने जाण्याची शक्यता होती. आजच्या निर्णयानंतर आता हे मत पुन्हा भाजपकडे येणार आहे.
तिकडे, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांना प्रचार करणे अशक्य झाल्याने त्यांच्यावर हल्ले होत होते. आजच्या निर्णयानंतर परिस्थिती बदलेल. कॅप्टन अमरिंदर सिंग आता पंजाबमधील शेतकऱ्यांमध्ये आपला शिरकाव वाढवणार असून त्यांची भाजपशी युती निश्चित आहे. येत्या काही दिवसांत अकाली दलही भाजपच्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शहरी, ग्रामीण आणि शेतकरी यांची ही युती प्रबळ दावेदार ठरणार आहे.
पीएम मोदींनी कायदा मागे घेण्याचे कारण सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याचे कारण स्पष्ट केले आणि आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही, त्यामुळे आम्ही हे कायदे मागे घेत आहोत, असे सांगितले. पीएम मोदी म्हणाले की, कायदे मागे घेतले जात आहेत, पण हे कायदे पूर्णपणे शुद्ध आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी होते. आम्ही प्रयत्न करुनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांनाही कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, असे मोदी म्हणाले.