Pappu Yadav on Lawrence Bishnoi :बिहारचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी काही दिवसांपूर्वी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला 'दो टक्केका गुंडा' म्हटले होते. या विधानानंतर पप्पू यादवांना वेगवेगळ्या नंबरवरुन जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. आता याबाबत पप्पू यादव यांनी थेट भाष्य केले आहे. 'माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मी घाबरलोय, अशी लोक माझ्यावर टीका करत आहेत. पण, माझ्या आयुष्यात भीतीला वाव नाही. लॉरेन्सला जेव्हाही मला मारायचे असेल, तेव्हा तो येऊन मला मारू शकतो. मी त्याला थांबवणार नाही,' असे पप्पू यादव म्हणाले.
'मला मारायचे असेल, तर लवकर मारुन टाक. मी सर्व काही सोडू शकतो, पण मला भीतीने जगण्याची सवय नाही, मी माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. लॉरेन्स बिश्नोईचा फोन आला तेव्हा मी त्याला सांगितले की, तुला कोणाला मारायचे ते मार. जर लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानला मारायचे असेल, तर त्याने मारावे, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. सलमानला वाचवणे किंवा न वाचवणे, ही सरकारची जबाबदारी आहे. लोकांनी माझ्या सुरक्षिततेची काळजी करू नये,' असेही पप्पू यादव म्हणाले.
पप्पू यादवांना धमक्या काय येत आहेत?मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादवने लॉरेन्स बिश्नोईवर टीका केली होती. कायद्याने परवानगी दिल्यास 24 तासांत या संपूर्ण टोळीचा खात्मा करू, असे ते म्हणाले होते. एक गुन्हेगार तुरुंगात बसून लोकांना धमक्या देतो, मारतो आणि प्रत्येकजण मूक प्रेक्षक बनत आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सातत्याने धमक्या येत आहेत.