पाटणा, दि. 10 - बिहारमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतरही मौनव्रत धारण करुन बसलेले जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आता उघडपणे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शरद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयावर शरद यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचा दौरा करत आपण लोकांशी संवाद साधणार असल्याचं शरद यादव यांनी सांगितलं आहे. शरद यादव यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, 'पाच वर्षांसाठी महाआघाडी करण्यात आली होती. 11 कोटी लोकांच्या विश्वासाला तडा गेला आहे'.
शरद यादव गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याचं वृत्त येत होतं. आरजेडीसोबत आपली मैत्री संपवत भाजपाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे वाटचाल सुरु केल्याने शरद यादव नितीश कुमारांवर नाराज आहेत. दरम्यान शरद यादव जेडीयूमधून वेगळे होऊन आपला पक्ष उभा करतील अशा बातम्याही येत होत्या. जानकारांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, शरद यादव दौरा संपल्यानंतर एखादी मोठी घोषणा करु शकतात.