काँग्रेस खासदार राहुल गांधी आज दुपारी 12 वाजता लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलणार आहेत. तत्पूर्वी, अविश्वास ठरावाच्या पहिल्याच दिवशी पहिलेच वक्ते म्हणून राहुल गांधी बोलणार होते. मात्र त्यांच्या जागी गौरव गोगोई बोलले. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, आज राहुल गांधी लोकसभेमध्ये बोलणार आहेत. दुपारी 12 वाजता ते चर्चेला सुरुवात करतील. राहुल गांधींनी का निवडली 12 वाजताची वेळ? -महत्वाचे म्हणजे, आज भारत छोडो आंदोलनाचा स्मृती दिवस आहे. याशिवाय, आज जागतिक आदिवासी दिनही आहे. यामुळेच राहुल गांधी यांनी ही वेळ निवडली आहे. कारण या दोन महत्वाच्या दिवशी ते केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवू शकतात. मणिपूर हिंसाचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. यावरून राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी मणिपूरला जाऊन पीडितांची भेटही घेतली होती. राहुल आपल्या भाषणात मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रावर हल्ला चढवू शकतात, असे मानले जात आहे.तत्पूर्वी, मोदी आडनावावरून झालेल्या वादानंतर राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर, आता पुन्हा एकदा राहुल यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. यामुळे आज ते संसदेत काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी राहुल गांधींनी आजच 12 वाजताची वेळ का निवडली? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 11:28 AM