आदेश रावल -
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या १४ जानेवारीपासून सुरू होणार असलेल्या यात्रेचे नाव बदलून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे करण्यात आले आहे. पूर्वी या यात्रेला ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले होते. यात्रेची चर्चा सुरू झाली, तेव्हा भारत जोडो यात्रा - भाग-२, भारत न्याय यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा, अशा अनेक नावांची चर्चा झाली.
आठवडाभरापूर्वी भारत न्याय यात्रा हे नाव देण्यात आले होते, तेव्हापासूनच काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती की नाव बदलण्याची काय गरज होती? आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रभारी सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीतही अनेक नेत्यांनी नावावर चर्चा केली. त्यामुळे भारत जोडो यात्रेसोबत न्याय हा शब्दही जोडावा, अशी भूमिका इतर अनेक नेत्यांनी मांडली. हा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वीकारला आणि त्यामुळे राहुल गांधींच्या या प्रवासाला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले.