रस्ते, बंदर, विमानतळ सारं अदानींनाच का दिलं?; राहुल गांधींचा भर सभागृहात मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:59 PM2023-02-07T15:59:13+5:302023-02-07T16:00:23+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Why did roads ports airports give to Adani Rahul Gandhi asked Modi in the House | रस्ते, बंदर, विमानतळ सारं अदानींनाच का दिलं?; राहुल गांधींचा भर सभागृहात मोदींना सवाल

रस्ते, बंदर, विमानतळ सारं अदानींनाच का दिलं?; राहुल गांधींचा भर सभागृहात मोदींना सवाल

Next

नवी दिल्ली-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. देशातील रस्ते, बंदर, विमानतळं सारंकाही अदानींनाच का बरं दिलं गेलं? असा थेट सवाल यावेळी राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे. तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अनेक योजनांचा उल्लेख केला गेला. पण अग्नीवीर योजनेबाबत फक्त एकदाच छोटासा उल्लेख केला गेला. त्यातही बेरोजगारी आणि महागाईचा उल्लेखही नव्हता. जनतेचं म्हणणं राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अजिबात नव्हतं, असंही राहुल गांधी म्हणाले. 

गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींचं काय नातं? संसदेत फोटो दाखवत राहुल गांधींचा सवाल...

"मी जिथं जिथं जातोय तिथं नुसतं अदानींचं नाव ऐकायला मिळतंय. केरळ असो तामीळनाडू असो किंवा संपूर्ण देश असो सर्व ठिकाणी अदानी...अदानी..अदानींचंच नाव दिसतंय. लोक मला भेटतात तेव्हा अदानींबाबत दोन-तीन प्रश्न विचारतात. ते कोणत्याही व्यवसायात सहजपणे शिरतात आणि यश प्राप्त करतात हे त्यांना कसं काय जमतंय? देशातील तरुणही मला हेच विचारतात आणि त्यांनाही जाणून घ्यायचं आहे की अदानींच्या यशाचं गुपीत नेमकं काय आहे?", असा टोला राहुल गांधी यांनी सरकारला लगावला. 

"अदानी ८ ते १० व्यवसायांमध्ये काम करतात. सिमेंट, पोर्ट, एनर्जी आणि इतर बरंच काही. मग लोक विचारायचे की २०१४ ते २०२२ पर्यंत अदानींच्या संपत्तीत इतकी मोठी वाढ कशी काय झाली? ते ८ अब्ज वरून १०८ अब्जांपर्यंत कसे काय पोहोचले? २०१४ मध्ये ते श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते. आज अदानी देशातील प्रमुख क्षेत्रांमध्ये आहेत. पंतप्रधान मोदींचं अदानींसोबतचं नातं नेमकं काय?", असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. 

'व्हायब्रंट गुजरात'पासून सुरू झाला अदानींचा खेळ
"उद्योजकांना सोबत घेतल्यास गुजरातला व्हायब्रंट बनवता येईल आणि राज्य पुढे जाईल असा विचार मोदींनी केला. तेव्हापासूनच हा खेळ सुरू झाला. मोदी २०१४ मध्ये दिल्लीत आले. २०१६ मध्ये अदानी श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते आणि काही वर्षांत ते थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी भारताच्या विमानतळाचा विकास करण्यासाठी सरकारचा नियम होता की ज्याला विमानतळ बांधण्याचा अनुभव नाही तो विमानतळ बांधू शकत नाही. मग मोदी सरकारनं नियमात बदल केला. आता नियम कुणी बनवला हे महत्वाचं नाही. पण नियम कुणी बदलला हे महत्वाचं आहे. अदानींना देशातील ६ महत्वाची विमानतळं दिली गेली", असा आरोप राहुल गांधींनी केला. 

ईडीचा धाक दाखवून अदानींना दिलं विमानतळ
सरकारवर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, ईडीच्या कारवाईचा धाक दाखवून भारतातील सर्वात फायदेशीर विमानतळ अदानींच्या ताब्यात देण्यात आलं आहे. भारतातील विमानतळावरील एकूण वाहतूकीपैकी २४ टक्के वाहतूक अदानींचं व्यवस्थापन असलेल्या विमानतळांची आहे.

Web Title: Why did roads ports airports give to Adani Rahul Gandhi asked Modi in the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.