उत्तर प्रदेशातील आग्रा येथे इअरफोन तोडण्यावरून पती-पत्नीमध्ये मोठा वाद होऊन दोघांच्या नात्यात दुरावा आला. इअरफोन तोडल्याने संतापलेली पत्नी माहेरी गेली ती तीन महिने तिथेच राहिली. पतीही तिला घेण्यासाठी माहेरी न आल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार केली. हे प्रकरण सुनावणीसाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचले.
समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी पती-पत्नीची तक्रार ऐकली असता, त्यांच्या नात्यात हा दुरावा केवळ इअरफोनमुळे आल्याचे समजले. ताजगंज भागातील एका तरुणाचा विवाह जगदीशपुरा येथील तरुणीशी चार वर्षांपूर्वी झाला होता. या जोडप्याला एक मुलगीही आहे. ३ महिन्यांपूर्वी पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते.
पत्नी मोबाइल फोनवर कोणाशी तरी बोलायची आणि तिचे त्याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय पतीला होता. या कारणावरून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या मोबाइलचा इअरफोन तोडला. इअरफोन तोडल्याने संतापलेली पत्नी थेट माहेरी गेली. तीन महिने पतीही तिला घ्यायला आला नाही.
पती-पत्नीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समुपदेशक खिरवार यांनी दोघांनाही समजावून सांगितले. यावेळी पतीने नवीन इअरफोन घेऊन दिला तरच मी सासरी येईन अशी अट पत्नीने टाकली. अखेर पतीनेही यासाठी होकार दिल्यानंतर इअरफोन घेऊनच पत्नी सासरी आली. इअरफोनचे हे प्रकरण सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर आपली मते व्यक्त करत आहेत.