नवी दिल्ली - नवरा-बायकोच्या कडाक्याच्या भांडणाचा फटका विमान सेवेला बसला. दिल्ली विमानतळावर इमनजन्सी लँडिंग झाल्याचे कारण कळताच अनेकांनी डोक्यावर हात मारला. बुधवारी म्यूनिखहून बँकॉकला चाललेल्या लुफ्थांसाच्या एका विमानात नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले. या भांडणात काय करायचे हे विमानातील क्रू मेंबर्सनाही कळाले नाही. क्रू मेंबर्सने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही ऐकले नाही. जर्मन व्यक्ती आणि त्याच्या थाई पत्नीमधील या भांडणामुळे लुफ्थांसा विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. पतीला दिल्लीत उतरवले तर पत्नीला लुफ्थांसा विमानानं बँकॉकसाठी रवाना केले.
या महाभाग प्रवाशांविरोधात कुणीही पोलीस तक्रार केली नाही. यांनी सुरक्षा एजन्सीची माफीही मागितली. मात्र या प्रकारामुळे काही तास विमान प्रवास लांबला. भारतीय विमानतळावरून या विमानाने बँकॉकसाठी उड्डाण घेतले. परंतु नवरा-बायकोमध्ये इतकं भांडण होण्याची वेळ का आली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. माहितीनुसार, पत्नीने पतीच्या वागणुकीबाबत पायलटकडे तक्रार दिली. नवरा धमकावतोय असं तिने म्हटलं. ५३ वर्षीय जर्मन पतीने सुरुवातीला जेवण फेकले. त्यानंतर लायटरने चादर जाळण्याचा प्रयत्न केला. बायकोवर ओरडत होता.विमानातील क्रू मेंबर्सने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने नियमांचे उल्लंघन केले.अखेर पायलटने विमानाची दिशा बदलत इमरजन्सी म्हणून दिल्लीत लँडिंग केले त्यानंतर CISF च्या जवानाने त्याला विमानातून खाली उतरवले.
तपासात कळाले की, काहीतरी कारणामुळे पती-पत्नीत वाद झाला. या वादात पती जोरजोरात पत्नीला ओरडू लागला आणि तिथूनच भांडणाला सुरुवात झाली. पत्नी वेगळ्या पीएनआर तिकीटवर प्रवास करत होती तिला बँकॉकपर्यंत तिचा प्रवास पूर्ण करायचा होता. महिला लुफ्थांसा विमानाने रवाना झाली. तर लुफ्थांसा विमानाने भांडण करणाऱ्या या पतीला यापुढच्या काळात विमान प्रवास बंदी घातली आहे. वैवाहिक कारणामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाण भारताच्या दिशेने उतरवण्यात आल्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडलाय असं नाही. याआधी नोव्हेंबर २०१७ मध्ये कतार एअरवेजच्या दोहा-बाली नॉनस्टॉप उड्डाणाला चेन्नईमध्ये उतरवण्यात आले होते. कारण या विमानात झोपलेल्या पतीच्या अंगठ्याचा वापर करत पत्नीने त्याचा फोन अनलॉक केलेला पतीने पाहिला. यावरून दोघांमध्ये मोठं भांडण झाले. त्यातून या विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले होते.