संसदेत आज धक्कादायक प्रकार घडला आहे. लोकसभेच्या खासदारांच्या बसण्याच्या जागेपासून अवघ्या १०-१२ फुट उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उडी मारली होती. तसेच या तरुणांनी पिवळे स्मोक कँडलही फोडले होते. जेव्हा पहिल्या तरुणाने उडी मारली ती बसपाचे खासदार मलूक नागर यांच्या बरोबर पाठीमागे मारली. त्यांनी या प्रसंगाचे वर्णन ''मृत्यू समोर दिसत होता, जिवंत राहू की नाही'' अशा शब्दांत केले आहे.
सुदैवाने लोकसभेत दुर्दैवी घटना घडली नाही, परंतु जे घडले त्यामुळे खासदारांमध्ये भितीचे वातावरण दिसत होते. नागर यांनी सांगितले की, जेवणाच्या सुटीसाठी चार पाच मिनिटांचा अवकाश होता. तितक्यात माझ्या मागे धाडकन काही तरी पडल्याचा आवाज आला. कोण पडले हे पाहण्यासाठी मी मागे वळलो तर एक तरुण दिसला. तितक्यात त्याच्या मागोमाग आणखी एकाने उडी मारल्याचे सांगितले.
या दोघांना पाहून माझ्या मनात पहिल्यांदा विचार आला की या लोकांचा नियत खराब आहे. यांच्याकडे शस्त्रे असतील तर, या भितीने ते काही करतील त्यापूर्वीच आजुबाजुचे खासदार व मी मिळून त्यांच्यावरच हल्ला केला. ते काही करतील, या भीतीने आम्ही त्यांच्यावर तुटून पडलो. काही खासदारांनी त्याला मारहाणही केली. धुराचा खूप वाईट वास येत होता, असे खासदार म्हणाले. या भीतीमुळे सुरक्षा रक्षकांची वाट न पाहता खासदारांनीच त्यांना पकडल्याचे सांगण्यात आले.
त्या तरुणांना पाहताच आम्ही समजून चुकलो की ते काहीतरी इराद्याने आले आहेत. या तरुणाने बुटातून काहीतरी बाहेर काढले. त्यातून पिवळ्या रंगाचा धूर निघू लागला होता. एवढा जास्त धूर पसरला की श्वास घेणे कठीण झाले होते. आजुबाजुला एवढा गोंधळ सुरु झाला की फक्त हुकुमशाही चालणार नाही, असे काहीसे ते बडबडत असल्याचे ऐकायला आले होते, असे मलूक नागर यांनी सांगितले.